कोल्हापूर,
kolhapur heavy rainfall कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. गेल्या २४ तासांत पंचगंगा नदीची पाणीपातळी तब्बल १० फुटांनी वाढल्याची नोंद झाली आहे. नदीच्या उपनद्यांनीही आपले पात्र सोडले असून अनेक भागांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे.
पंचगंगा नदीची प्रमुख उपनदी असलेल्या कासारी नदीनेही आपले पात्र सोडले असून तिचे पाणी आजूबाजूच्या शेतांमध्ये पसरले आहे. या परिस्थितीचे ड्रोनद्वारे टिपलेले दृश्य कोल्हापुरातील विक्रम खोत यांनी कॅमेऱ्यात कैद केले आहे. या दृश्यांमधून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाची तीव्रता स्पष्टपणे दिसून येत आहे.
गेल्या पाच दिवसांपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास पंचगंगा नदीही लवकरच आपले पात्र सोडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाढत्या पाण्याने नदीकाठावरील मारुती मंदिराच्या पायरीलाही स्पर्श केल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी,kolhapur heavy rainfall शाहूवाडी आणि गगनबावडा या तालुक्यांसह एकूण २२ गावांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये एकूण ५९५ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, १६ धरण क्षेत्रांमध्ये तब्बल २,१७० मि.मी. पाऊस पडल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान, आज जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. वाढत्या पावसामुळे परिस्थितीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे आणि संभाव्य पूरस्थितीचा धोका लक्षात घेता सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.