अनिल कांबळे
नागपूर,
mankapur murder news शहरातील मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी पहाटे एका ४३ वर्षीय व्यक्तीची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा अवघ्या काही तासांत उलगडा करत पोलिसांनी मृताच्या मुलीच्या प्रियकराला अटक केली. मुलीला तिच्या पहिल्या पतीकडे परत पाठविण्याच्या वडिलाच्या हट्टातून ही हत्या केल्याची कबुली आरोपी तरुणाने दिली. मृताचे नाव मेहताबसिंग सोहनलाल चौधरी (४३) असून ते गवंडी काम करत होते. आरोपी रोहित गौतम हा शाळेची व्हॅन चालविण्याचे काम करतो.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहताबसिंग हे कुटुंबासह गोधनी रेल्वे परिसरातील एलआयसी कॉलनीसमोरील जमील सोसायटीतील भाड्याच्या घरात राहत होते. शनिवारी पहाटे सुमारे २ वाजताच्या सुमारास ते घराबाहेरील लोखंडी शेडमध्ये झोपले होते. त्यावेळी आरोपी रोहित गौतम याने कुऱ्हाडीसारख्या धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यावर सपासप वार केले. गंभीर दुखापतीमुळे मेहताबसिंग यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
घटनेची माहिती मिळताच मानकापूर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) व ३३३ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेच्या युनिट-५चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. संशयावरून रोहित गौतम याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली.चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, मेहताबसिंग यांनी आपल्या मुलीचे लग्न मध्यप्रदेशातील एका युवकाशी लावून दिले होते. पतीकडून मारहाण होत असल्याने ती सुमारे आठ महिन्यांपूर्वी नागपुरात परत आली. याच काळात तिचे रोहित गौतम याच्याशी प्रेमसंबंध जुळले. ती रोहितकडून गर्भवती होती. मात्र, मेहताबसिंग मुलीला पुन्हा तिच्या पहिल्या पतीकडे पाठविण्याचा आग्रह धरत होते. याच कारणावरून रोहितने नियोजनबद्ध पद्धतीने प्रेयसीच्या वडिलाची हत्या केल्याची कबुली दिली.