भोंदू मनोहर भोसलेविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल

महिलेवर अतिप्रसंग; लाखो रुपयेही लुबाडले

    दिनांक :05-Jul-2026
Total Views |
साेलापूर,

manohar bhosale case मी देवाचा अवतार आहे, असे सांगून भाेळ्याबापड्या लाेकांना फसवणाऱ्या भोंदू मनोहर भोसलेचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. आजारी नातेवाईकाची प्रकृती सुधारावी म्हणून आश्रमात आलेल्या एका असहाय्य महिलेवरच या नराधम भोंदूने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी करमाळा पोलिस ठाण्यात पीडित महिलेच्या तक्रारीवरुन भोसलेविरुद्ध अत्याचार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

manohar bhosale case 
पाेलिसांनुसार, पीडित महिलेचे नातेवाईक गंभीर आजारी होते. त्यांच्यावर अनेक उपचार करूनही प्रकृतीत काेणतीही सुधारणा झाली नाही़ दरम्यान, ओळखीतील लाेकांनी सूचवल्यावरून ती महिला २०२४ भाेंदू मनोहर भोसलेच्या घोटी येथील आश्रमात गेली़ भाेंदू भाेसले व त्याचा साथीदार नाथबाबाने दाजींना बरे करण्याच्या नावाखाली पीडितेकडून विविध मार्गांनी तब्बल १ लाख ६४ हजार रुपये उकळले.
पैशांची फसवणूक केल्यानंतर या भोंदूची वक्रदृष्टी पीडित महिलेवर पडली. त्याने तिला अमावस्येच्या रात्री 12 वाजता विधी करायचा आहे, असे सांगून महिलेला शारीरिक संबंध ठेवण्याबाबत दबाव टाकला. मात्र, पीडित महिलेने या अघोरी आणि चुकीच्या गोष्टीला स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतर नराधम भोंदूने तिला पिण्याच्या पाण्यातून गुंगीचे औषध दिले. महिला बेशुद्ध झाल्यानंतर तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत मनोहर भोसलेने तिच्यावर बळजबरीने अतिप्रसंग केला. या धक्कादायक प्रकारानंतर पीडित महिलेने धाडस दाखवून करमाळा पोलिसात तक्रार नोंदवली.
तपासासाठी एसआयटी स्थापन
सोलापूरचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी या प्रकरणाचे गांभीर्य आणि भोंदू मनोहर भोसलेच्या गुन्ह्यांची वाढती व्याप्ती लक्षात घेता अत्यंत कडक पावले उचलली आहेत. या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल तपासासाठी पाच उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्यांची विशेष तपास समिती (एसआयटी) स्थापन करण्यात आली आहे. ही समिती मनोहर भोसलेने हजारो भक्तांची फसवणूक करुन जमवलेल्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचा तपास करणार आहे़