मुंबई,
mosquitoes swarm सततच्या पावसामुळे राज्य विधिमंडळ परिसरात सध्या डास आणि माशांचे मोठे साम्राज्य निर्माण झाले आहे. विधानभवनातील अनेक दालने आणि केबिन्समध्ये या उपद्रवामुळे लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या वाढत्या त्रासाबाबत अनेकांनी तक्रारी केल्यानंतर, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी या प्रकाराची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी मुंबई महापालिका आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणांना विधिमंडळ परिसरात तातडीने कीटकनाशक फवारणी करण्याचे व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचे कडक आदेश दिले आहेत.
पावसाळ्याच्या दिवसांत डेंग्यू, मलेरिया यांसारख्या जलजन्य आणि कीटकजन्य आजारांचा धोका सर्वाधिक असतो. विधिमंडळाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, मंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचेही आरोग्य उत्तम राहणे अत्यंत आवश्यक आहे. 'आमदार, अधिकारी आणि पत्रकार आजारी पडलेले अजिबात चालणार नाही', अशी ठाम भूमिका घेत अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी पावसाळी आजारांवर तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश वैद्यकीय आणि प्रशासकीय यंत्रणांना दिले आहेत.