आता झाडांची दहशत… झाडाजवळून जाताना सावध राहा

    दिनांक :05-Jul-2026
Total Views |
मुंबई
tree fall incidents राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून मुंबईतील अनेक भागांत रस्त्यांवर पावसाचे पाणी साचल्याचे चित्र दिसत आहे. या सततच्या पावसादरम्यान दुर्घटनांची मालिकाही वाढली असून झाडे कोसळणे, वाहतुकीवर परिणाम होणे आणि रस्त्यांवरील उघड्या मॅनहोल्समुळे धोक्याचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांत झाड कोसळण्याच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
 

tree fall incidents  
 
 
मुंबईतील चेंबूर परिसरात काही दिवसांपूर्वी झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दादर येथे 100 वर्ष जुने वडाचे झाड कोसळल्याची घटना घडली. यानंतर पुन्हा एकदा दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात झाड कोसळल्याची नोंद झाली आहे. तसेच दादरनंतर चेंबूरच्या वामनवाडी रोडवरही झाड कोसळले असून या घटनांमुळे परिसरात चिंता वाढली आहे.
घाटकोपर येथे विक्रांत सर्कलजवळ मध्यरात्री झाड कोसळून वाहनांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आणि झाड हटवण्याचे काम सुरू करण्यात आले.
विलेपार्ले परिसरातही झाड कोसळून एका टेम्पोवर ते पडले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र झाड काटेरी असल्याने ते हटवण्यात अडचणी निर्माण झाल्या. ही घटना विलेपार्ले अग्निशमन केंद्रासमोर घडली असून प्रशासनाकडून झाड हटवण्याचे काम सुरू आहे.
नवी मुंबईतील सानपाडा ते वाशी दरम्यान असलेल्या जॉगिंग ट्रॅकवर दोन दिवसांपूर्वी झाड कोसळले होते. हे झाड अद्याप नवी मुंबई उद्यान विभागाकडून हटवले गेलेले नाही. त्या वेळी जॉगिंग ट्रॅकवर कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे.रायगड जिल्ह्यातील रोहा–नागोठणे मार्गावरील भिसे खिंडीत मुसळधार पावसामुळे मातीचा मलबा आणि झाड रस्त्यावर कोसळले आहे. यामुळे या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे.पुणे शहरातील बीएमसीसी महाविद्यालय परिसरात रस्त्यावर अचानक झाड कोसळले. सकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.जळगाव येथील ममुराबाद रस्त्यावरील सोना नगर परिसरात उभ्या कारवर कडुनिंबाचे झाड कोसळले. या घटनेत कारच्या मागील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने त्या वेळी आसपास कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. संबंधित कार धीरज चौधरी यांची असल्याची माहिती समोर आली आहे.या सर्व घटनांमुळे राज्यभरात मुसळधार पावसाचा परिणाम अधिक तीव्र होत असून प्रशासनावर झाडे पडणे, वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षिततेबाबत गंभीर आव्हाने उभी राहिली आहेत.