ठाणे,
thane heavy rain ठाण्यातील मुंब्रा परिसरात मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा भिंत कोसळण्याची घटना घडली असून संजय नगर भागात एका भिंतीचा मोठा भाग कोसळल्याने परिसरात घबराट पसरली आहे. या दुर्घटनेत जवळील तीन घरांचे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जिवितहानी किंवा दुखापत झालेली नसून स्थानिक नागरिकांनी वेळेत घराबाहेर धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे स्पष्ट झाले आहे.
याचदरम्यान मुंब्र्यातील नामांकित सेंट मेरी शाळेची संरक्षक भिंतही कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शाळेजवळील भागात काही काळासाठी वाहतूकही थांबवण्यात आली होती. सुदैवाने या वेळी विद्यार्थी शाळेत उपस्थित नव्हते, त्यामुळे कोणतीही अप्रिय घटना घडली नाही.
घटनेची माहिती मिळताच thane heavy rain महानगरपालिकेचे अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून परिसरातील धोकादायक भागाची पाहणी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याने स्थानिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.