नागपूर
nagpur fda raid सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी बदली झाल्यानंतर एफडीए विभाग अधिकच अॅक्शन मोडमध्ये आल्याचे चित्र दिसत आहे. एफडीएच्या धडक कारवाईमुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले असून दूध, पनीरपासून ते विविध खाद्यपदार्थ आणि सौंदर्य प्रसाधनांच्या साहित्यावर सातत्याने छापे टाकले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आता सौंदर्य प्रसाधन क्षेत्रातील एक कंपनी थेट एफडीएच्या रडारवर आली असून, तिच्या उत्पादनात विषारी घटक आढळल्याने गंभीर बाब समोर आली आहे.
‘गोरी ब्युटी क्रीम’ या नावाने बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्री होणाऱ्या फेअरनेस क्रीममध्ये मानवी आरोग्यास अत्यंत घातक ठरणारे घटक असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकृत तपासणीत सिद्ध झाले आहे. या क्रीममध्ये विषारी जड धातू ‘पारा’ (Mercury) आणि ‘शिसे’ (Lead) हे निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात आढळून आले असून, त्यामुळे हे उत्पादन पूर्णतः असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निष्कर्षानंतर प्रशासनाने या क्रीमची खरेदी, विक्री, वितरण आणि वापरावर तातडीने बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत.
एप्रिल महिन्यात एफडीएच्या पथकाने नागपूरजवळील कामठी आणि शहरातील इतवारी परिसरात मोठ्या प्रमाणावर छापे टाकून या ब्युटी क्रीमचा साठा जप्त केला होता. त्यानंतर १० मे रोजी या नमुन्यांना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. सुमारे दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर या तपासणीचा अधिकृत अहवाल प्राप्त झाला असून, त्यात या क्रीममधील धक्कादायक आणि आरोग्यासाठी धोकादायक वास्तव समोर आले आहे.
सौंदर्य प्रसाधनांमध्ये nagpur fda raid पारा आणि शिसे यांसारख्या जड धातूंचा वापर त्वचेसाठी अत्यंत हानिकारक मानला जातो. अशा घटकांमुळे त्वचेचे गंभीर आजार, ॲलर्जी, काळे डाग यांसारख्या समस्या उद्भवू शकतात, तसेच दीर्घकाळ वापर केल्यास त्वचेच्या कर्करोगाचा (Skin Cancer) धोका निर्माण होण्याची शक्यता असते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
हा अहवाल समोर आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने कडक भूमिका घेत संबंधित साठा बाजारातून तातडीने मागे घेण्याचे निर्देश विक्रेत्यांना दिले आहेत. तसेच नागरिकांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता या क्रीमचा वापर त्वरित थांबवावा, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.