नागपूर,
nagpur instagram chat violence अल्पवयीन मुलीची इन्स्टाग्रामवर एका तरुणाशी ओळख झाली. तो तिला वारंवार मॅसेज करून भेटण्यासाठी गळ घालू लागला. यामुळे त्रस्त विद्यार्थिनीने आपल्या मित्राला त्याची समजूत घालण्यासाठी पाठविले. मात्र तरुणाने साथीदारांसोबत मिळून त्या युवकाला बेदम मारहाण केली आणि मोबाईल हिसकावून पसार झाला. ही घटना पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुख्य आरोपीला अटक केली आहे. आदित्य कोचे असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही बारावीची विद्यार्थिनी असून तिची दोन दिवसांपूर्वी आदित्यशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यानंतर तो तिला सतत संदेश पाठवू लागला. वारंवार भेटण्याचा आग्रह करू लागला. सततच्या संदेशांमुळे विद्यार्थिनी त्रस्त झाली. तिने हा प्रकार तिचा मित्र रमीज अहमद याला सांगितला. रमीज हा आदित्यला समजावण्यासाठी राणी दुर्गावती चौकात भेटायला गेला. nagpur instagram chat violence तेथे आदित्य आणि त्याच्या सहा साथीदारांनी रमीजला घेरले. शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याचा मोबाईल हिसकावून सर्वजण पसार झाले. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. रमीजने पाचपावली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी आदित्यविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पोलिसांनी त्याच्या अन्य सहा साथीदारांचीही ओळख पटविली आहे. त्यांचा शोध सुरू असून लवकरच त्यांनाही अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.