अनिल कांबळे
नागपूर,
nagpur molestation case पार्किंगमध्ये दुचाकी उभी करण्याच्या वादातून एका तरुणीशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जुलै रोजी रात्री सुमारे ९ वाजता पिपळा फाटा येथील एका अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये विपिन धकाते (२८) याने एका तरुणीची दुचाकी हटवून त्या जागी स्वतःची मोटारसायकल उभी केली. याबाबत माहिती मिळावी म्हणून संबंधित तरुणीने सोसायटीच्या ग्रुपवर त्या वाहनाचा फोटो शेअर केला. याचा राग आल्याने आरोपीने तरुणीशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्याने अश्लील शिवीगाळ करत, "माझ्या गाडीला हात लावून दाखव," अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपीने तरुणीला धक्का देत तिच्याशी अशोभनीय वर्तन करून विनयभंग केला. या घटनेनंतर पीडित तरुणीने हुडकेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
महिलेला जीवे मारण्याची धमकी
नागपूर,
मुलाला डबा देऊन परतणाऱ्या ४५ वर्षीय महिलेशी जबरदस्ती करून तिचा विनयभंग केल्याची तसेच विरोध केल्यावर जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० जून रोजी संबंधित महिला आपल्या मुलाला डबा देऊन परतत होती. त्यावेळी ती एका हॉलमध्ये डबा ठेवत असताना अजय वासुदेव बोंडे (४८, रा. चिंचभवन-शिवणगाव) हा आरोपी मागून आला आणि त्याने हॉलचे दार बंद केले. आरोपीने महिलेचा हात पकडून तिच्याशी अशोभनीय वर्तन करत विनयभंग केला. महिलेने प्रतिकार केला असता आरोपीने तिला परिणाम भोगावे लागतील तसेच जीवे मारण्याची धमकी दिली आणि तेथून पळ काढला. घटनेनंतर पीडित महिलेने सोनेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला.