काटोल,
orange processing industry to restart काटोलमधील संत्रा उद्योग केंद्र एमआयडीसीने लिलावात जिंकले असून, १३ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यामुळे हा प्रक्रिया उद्योग लवकरच सुरू होणार आहे. यामुळे संत्रा, मोसंबी व लिंबू उत्पादकांना मोठा दिलासा मिळेल, अशी घोषणा आ. चरणसिंग ठाकूर यांनी केली. कृषी उत्पन्न बाजार समिती काटोलच्या वतीने सहकार महर्षी बाबासाहेब केदार मार्केट यार्ड येथे आयोजित 'नैसर्गिक शेती कार्यशाळेत' शेतकरी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी आ. ठाकूर यांनी आपल्या भाषणात मतदारसंघातील विविध मोठ्या विकासकामांची सविस्तर माहिती दिली. विदर्भ आणि काटोल-नरखेड परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार पूर्णपणे कटिबद्ध असून, विविध महत्त्वाकांक्षी योजनांच्या माध्यमातून या मतदारसंघाचा कायापालट केला जाईल, असा विश्वास आ. ठाकूर यांनी व्यक्त केला. या कार्यशाळेचे परिसरातील नैसर्गिक शेती करणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये सावरगाव येथील महिला शेतकरी पपीता सहारे आणि वर्षा इरुतकर यांचा आ. ठाकूर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच, कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रकाश केवलवानी यांचाही सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तालुका समन्वय समिती अध्यक्ष दिनेश ठाकरे, कृउबा समितीचे उपसभापती गंगाधर झळके आणि माजी नगराध्यक्ष वैशाली ठाकूर, संचालक किशोर गाढवे, नितीन डेहनकर, प्रफुल्ल गजभिये, तालुका कृषी अधिकारी जयंत कौटकर, निलिमा रेवतकर उपस्थित होत्या. कार्यशाळेला नागरिक व महिलांची मोठी उपस्थिती होती.
महत्त्वाच्या घोषणा
१. बाजार समिती विकास : काटोल बाजार समितीसाठी १२ कोटींचा निधी मंजूर झाला असून, कोळंबी येथे तालुक्याचे मोठे 'सब्जी व संत्रा मार्केट' उभारले जाईल.
२. पाण्याचा प्रश्न : ९० हजार कोटींच्या 'नळगंगा-जलगंगा' योजनेमुळे मतदारसंघातील २८ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येईल.
३. विशेष बैठक : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आगामी सोमवारी मुंबईत मंत्रालयात कृषीमंत्र्यांसोबत विशेष बैठक होणार आहे.
४. सोसायट्यांना निधी : १००% कर्ज वसुली करणाऱ्या १० सोसायट्यांना कार्यालयासाठी प्रत्येकी २० लाख रुपये दिले जातील.