क्रीडाभारती सायकलिंग ग्रुपचे वारकरी रवाना : देवानंद पवार यांच्याकडून स्वागत
यवतमाळ,
Pandhari: ‘Cycle Journey’ विठ्ठलनामाचा अखंड गजर, टाळ-मृदंगाचा निनाद, रिंगणातील भक्तिभाव आणि सायकलच्या चाकांचा वेग अशा भक्तिमय वातावरणात क्रीडाभारती सायकलिंग ग्रुपची ‘पंढरपूर सायकलवारी 2026’ रविवारी श्री विठ्ठल-रुखमाईच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना झाली. सलग चौथ्या वर्षी आयोजित आलेल्या या सायकलवारीने शहरातील नागरिकांमध्ये भक्ती, शिस्त आणि सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी संदेश दिला. या सायकलवारीत हेमंत राजूरकर, राजेश लोणकर, डॉ. सौरभ नंदुरकर, प्रभाकर डफाळ, राहुल सारवे, अॅड. राम तांबुळे, दिलीप राखे, शैलेश देशमुख, संजय शिवरामवार, मिलिंद सोळंके, राजीव कानसकर, अॅड. प्रणव जैन, नवल उपाध्याय यांच्यासह अनेक सायकलस्वार वारकरी सहभागी झाले आहेत.
शिवतीर्थ येथून प्रारंभ झालेली ही सायकलवारी तिरंगा चौक, हनुमान आखाडा, शनिमंदिर, दत्त चौक, दाते महाविद्यालय, आर्णी नाका आणि राणा प्रताप चौक मार्गे काळे लेआऊट मैदानात दाखल झाली. मार्गभर नागरिकांनी माऊली माऊली, ग्यानबा तुकाराम आणि पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम..! च्या जयघोषात वारकरी बांधवांचे उत्स्फूर्त स्वागत केले. विठ्ठलनामाचा गजर, रिंगण, टाळ-मृदंगाचा नाद आणि सायकलच्या चाकांचा वेग यांचा अनोखा संगम उपस्थितांना अनुभवता आला. काळे लेआऊट मैदानात जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा भाजपाचे नेते देवानंद पवार तसेच प्रसिद्ध छायाचित्रकार सारंग बुरडकर यांच्या हस्ते वारकरी सायकलस्वारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना देवानंद पवार यांनी, वारकरी बांधवांना पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी संपूर्ण महाराष्ट्राच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले. राज्यावरील अल-निनोचे संकट पूर्णपणे दूर होवो, राज्यात भरपूर व समाधानकारक पाऊस पडो, जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी बांधवांच्या शेतात भरघोस पीक येवो आणि जिल्ह्यातील जनतेला सुखी, समाधानी व निरोगी ठेव, अशी प्रार्थना विठ्ठलचरणी करण्याची विनंती वारकèयांना केली. यावेळी अजय चव्हाण, डॉ. प्रसाद धाडसे, अशोक कार्लेकर, कृणाल ठाकूर, मारोती चव्हाण, सुनील काळे, राहुल सोनवणे, राजेश डंभारे, गजानन भोयर, प्रिया चौधरी, माधुरी तांबेकर, अश्विनी कार्लेकर, नीलिमा लोणकर, चेतना पवार, प्राची चव्हाण यांच्यासह नागरिक उपस्थित होते.