सर्कस' की रस्ता?

- मौद्यात चिखलातून जीवघेणी कसरत; ठेकेदाराचा निष्काळजीपणा,अपघातांची मालिका सुरुच

    दिनांक :05-Jul-2026
Total Views |
मौदा,
nimkheda-mouda-road : मान्सूनच्या सुरुवातीलाच मौदा तालुक्यातील निमखेडा ते मौदा मार्गाची दुरवस्था झाली असून, स्थानिक नागरिक आणि शाळकरी मुलांचे जीणे असह्य झाले आहे. गेल्या एका वर्षापासून या रस्त्याचे बांधकाम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. त्यातच ऐन पावसाळ्यात ठेकेदाराने रस्त्याचे खोदकाम करून ठेवल्यामुळे संपूर्ण मार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. भेंडाळा आणि परिसरातील विद्यार्थ्यांना रोज जीव मुठीत धरून या दलदलीतून शाळा गाठावी लागत असल्याने पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
 
 

ai 
 
 
विशेष म्हणजे, रस्ता खोदल्यानंतर वाहनधारकांसाठी कोणताही पर्यायी मार्ग तयार करण्यात आलेला नाही. पहिल्याच पावसात संपूर्ण रस्ता चिखलात रुतल्यामुळे गेल्या काही दिवसांत ५० हून अधिक दुचाकी वाहने घसरून अपघातग्रस्त झाली आहेत. यामध्ये अनेक वृद्ध, महिला आणि निष्पाप शाळकरी मुले गंभीर जखमी झाली आहेत. रोजच्या या अपघातांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
 
 
वारंवार होणारे अपघात आणि नागरिकांचा आक्रोश समोर येत असतानाही, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वरिष्ठ अधिकारी या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करून तात्काळ पर्यायी रस्ता तयार करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.