दुरुस्तीचा बहाणा अन् पलंग चोरीचा डाव; माजी विद्यार्थी जेरबंद

    दिनांक :05-Jul-2026
Total Views |
कोची,
pretextt of repairs and a plot to steal a bed केरळमधील कोची येथे एका महाविद्यालयाच्या वसतिगृहातून पलंग चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या माजी विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महाराजा कॉलेजच्या वसतिगृहात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, आरोपी पलंग नेण्यासाठी पिकअप व्हॅन घेऊन आल्याचे तपासात समोर आले आहे. वसतिगृहाच्या वॉर्डनला संशय आल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आणि तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली.
 
kochi
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव अ‍ॅन्स्टन असून तो एर्नाकुलम जिल्ह्यातील अंगमाली येथील रहिवासी आहे. त्याने महाराजा कॉलेजमधून २०२४ मध्ये वनस्पतीशास्त्र विषयात बी.एस्सी. पदवी पूर्ण केली होती. रविवारी पहाटे सुमारे ५ वाजता तो वसतिगृहात पोहोचला आणि पलंग दुरुस्तीसाठी हलविण्याचे काम सुरू असल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले. या बहाण्याने आरोपीने वसतिगृहातील अनेक पलंग वेगळे केले आणि त्यापैकी आठ पलंग ऑनलाइन सेवेद्वारे भाड्याने घेतलेल्या ट्रकमध्ये भरले. मात्र, वसतिगृहाच्या वॉर्डनला संशय आल्याने त्यांनी संबंधित कामासाठी अधिकृत परवानगीची कागदपत्रे मागितली. आरोपी समाधानकारक उत्तर देऊ न शकल्याने वॉर्डनने तातडीने महाविद्यालय प्रशासनाला सतर्क केले आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली.
 
माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशीसाठी एर्नाकुलम सेंट्रल पोलीस ठाण्यात नेले. पलंग वाहून नेण्यासाठी वापरण्यात आलेला ट्रकही पोलिसांनी जप्त केला आहे. तपासादरम्यान आरोपीच्या मोबाईल फोनची पाहणी करण्यात आली असता, त्याने वसतिगृहातील काही विद्यमान विद्यार्थ्यांशी संपर्क साधल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास सुरू असून आरोपीला लवकरच औपचारिक अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.