पुणे
pune firing पुण्यातील उरुळी देवाची परिसरात स्टील व्यावसायिकाच्या गोदामावर कोट्यवधी रुपयांच्या खंडणीसाठी झालेल्या गोळीबार प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत राजस्थानातून पवन कुमार या आरोपीला अटक केली आहे. घटनेनंतर फरार झालेल्या या आरोपीला राजस्थान–पंजाब सीमेवरील परिसरातून ताब्यात घेण्यात आले असून, त्याला ट्रान्झिट रिमांडवर पुण्यात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. या गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
ही घटना २२ जून रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास मांतरवाडी–कात्रज बायपास रोडवरील उरुळी देवाची परिसरात घडली होती. या वेळी लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने स्टील व्यावसायिकाकडे कोट्यवधी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. त्यानंतर गोदामाबाहेर गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, तपास गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे सोपवण्यात आला आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी pune firing घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी केली. आरोपींच्या पळून जाण्याच्या मार्गाचा मागोवा घेत उंड्री, नाशिक फाटा, नाशिक, सूरत आणि पुढे राजस्थानपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तपासात असे समोर आले की घटनेनंतर आरोपीने वापरलेली मोटारसायकल एका गृहनिर्माण सोसायटीजवळ सोडली होती. त्यानंतर त्याने दोन रिक्षांचा वापर करत नाशिक गाठले आणि पुढे कॅबने सूरतमार्गे राजस्थानात पलायन केले.तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी राजस्थानमध्ये लपल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी राजस्थान–पंजाब सीमेवर सापळा रचून त्याला अटक केली. चौकशीत पवन कुमार हा पूर्वी उरुळी देवाची परिसरातील एका कंपनीत मजूर म्हणून काम करत असल्याचेही समोर आले आहे. परिसराची चांगली माहिती असल्यामुळे त्याने गोदामाची रेकी करून टोळीला माहिती पुरवल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याच माहितीच्या आधारे खंडणीची मागणी आणि गोळीबाराचा कट रचण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.