आधार-मतदार कार्डावर २७ नेपाळी नागरिकांचा 'खेळ' उघड!

    दिनांक :05-Jul-2026
Total Views |
बलरामपूर,
aadhaar and voter id cards exposed उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यात भारत-नेपाळ सीमेलगत असलेल्या जरवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २७ नेपाळी नागरिकांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यक्तींनी भारतीय नागरिक असल्याचे भासवत आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि इतर कागदपत्रे मिळवून विविध सरकारी योजनांचा लाभ घेतल्याचा आरोप आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर झालेल्या चौकशीत ही बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
 
aadhaar and voter id cards exposed
 
पोलीस अधीक्षक विकास कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली. तपास अहवालात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याने संबंधित २७ जणांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. चौकशीत असे उघड झाले की, नेपाळमधील दांग जिल्ह्यातील कोइलाबस परिसरातील काही नागरिकांनी बलरामपूरमधील बालापूर, तुळसीपूर परिसर आणि शितलापूर रिझवान गल्ली येथे वास्तव्यास असल्याचे दाखवून भारतीय कागदपत्रे मिळवली होती. या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी सरकारी योजनांचा लाभ घेतल्याचा आरोप आहे.
 
तपासादरम्यान संबंधित व्यक्तींची नावे भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांच्या मतदार याद्यांमध्ये असल्याचेही समोर आले आहे. याशिवाय, कल्लू यांचा मुलगा अब्दुल रहमान हा अनवरदीहच्या बालापूर गावात वास्तव्यास नसल्याचे स्पष्ट झाले, तर अब्दुल अझीझ सिद्दिकी यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले असूनही त्यांचे नाव विविध अधिकृत नोंदींमध्ये असल्याचे तपासात आढळले आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, संबंधितांनी भारतीय ओळखपत्रांचा वापर करून सरकारी योजनांचा लाभ घेतला. तसेच ओळख लपवणे, भारतीय कागदपत्रांचा गैरवापर करणे आणि सरकारी नोंदींमध्ये चुकीची माहिती नोंदवणे अशा आरोपांचाही तपास सुरू आहे.
 
जरवा पोलीस ठाण्यात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व कागदपत्रांची सखोल पडताळणी सुरू आहे. विविध शासकीय विभागांतील नोंदींची जुळवणी करून तपास पुढे नेला जात असून, तपासात समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विकास कुमार यांनी दिली.