*ताडोबा बफरमधील मोहीम
चंद्रपूर,
Tadoba-Andhari Tiger Reserve ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील चोरगाव परिसरात तरुण शेतकर्याचा बळी घेणार्या वाघाला अखेर वनविभागाने शनिवारी बेशुद्ध करून जेरबंद केले. मागील आठवडाभर सुरू असलेल्या शोधमोहिमेला यश आल्याने परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. मागील आठवड्यात चोरगाव परिसरात संजय माधव सिडाम या तरुण शेतकर्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. संजय हे राजुरा तालुक्यातील केळझर येथील रहिवासी होते. चोरगाव येथे राहणार्या आपल्या सासर्यांच्या शेतीची देखभाल करण्यासाठी ते काही दिवसांपासून आले होते. शेतीच्या कामानिमित्त शेतात गेले असताना त्यांच्यावर वाघाने अचानक हल्ला केला. या घटनेमुळे चोरगावसह परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची गंभीर दखल घेत ताडोबा व्यवस्थापनाने संबंधित वाघाला पकडण्यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. आवश्यक प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर वनविभागाने विशेष बचाव मोहीम सुरू केली. या मोहिमेत अनुभवी अधिकारी, वनरक्षक, पशुवैद्यकीय तज्ज्ञ आणि कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला होता. वाघाच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवून त्याचा माग काढण्यात आला. शनिवारी सकाळी चोरगाव परिसरात वाघाचा ठावठिकाणा लागताच वनविभागाच्या पथकाने नियोजनबद्ध कारवाई केली. पशुवैद्यकीय पथकाने भूल देणारा डार्ट यशस्वीपणे मारल्यानंतर वाघ बेशुध्द झाला आणि त्याला सुरक्षितरीत्या जेरबंद करण्यात आले. संपूर्ण कारवाई अत्यंत सावधगिरीने पार पडली असून, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी परिसरात आवश्यक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दरम्यान, पकडण्यात आलेल्या वाघाची वैद्यकीय तपासणी करून त्याच्या आरोग्याची पाहणी करण्यात येणार असून, वन्यजीव संरक्षणाच्या नियमानुसार पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. वाघ जेरबंद झाल्याने चोरगाव व आसपासच्या गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असला, तरी जंगलालगतच्या भागात शेतकर्यांनी व नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे.