‘एनएसएस’ने यंदा वृक्षारोपण व प्लॉस्टिक मुक्ती मोहिम राबवावी

    दिनांक :05-Jul-2026
Total Views |
* कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांचे निर्देश
* विद्यापीठस्तरीय रासेयो वार्षिक नियोजन कार्यशाळा

चंद्रपूर, 
Tree Plantation and Plastic-Free Campaign चंद्रपूर व परिसरातील प्रदुषण नियंत्रणासाठी विशेष समिती गठित करून विद्यापीठ प्रयत्न करीत आहे. राष्ट्रीय सेवा योजना एक प्रभावी व्यासपीठ आहे. या संघटनेतील अधिकारी व हजारावर विद्यार्थ्यांच्या मदतीने वृक्षारोपण व प्लॉस्टिक मुक्तीची मोहिम उत्तमरित्या राबवता येते. यंदा हाच विषय घेऊन एनएसएसने युध्दस्तरावर कार्य करावे, असे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांत बोकारे यांनी केले.
 
 
bakare
 
गोंडवाना विद्यापीठ आणि येथील सरदार पटेल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठस्तरीय ‘प्राचार्य व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी वार्षिक नियोजन कार्यशाळेचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर, गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. संजय गोरे, सिनेट सदस्य तथा चंद्रपूर प्रदुषण नियंत्रण समितीचे प्रस्तावक संजय रामगिरवार, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. श्याम खंडारे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप गोंड उपस्थित होते.
 
 
डॉ. काटकर यांनी, राष्ट्रीय सेवा योजना ही केवळ कार्यक्रम राबविणारी योजना नसून, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, नेतृत्व गुण आणि सेवाभाव निर्माण करणारी चळवळ असल्याचे सांगितले. गोंडवाना विद्यापीठात स्वतंत्र रासेयो ‘ओपन युनिट’ सुरू करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. कार्यशाळेच्या प्रथम सत्रात संजय रामगिरवार यांनी, ‘चंद्रपूर प्रदूषण नियंत्रण मोहीम आणि वृक्षारोपण’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते, असे आवाहन केले. द्वितीय सत्रात राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. श्याम खंडारे, चंद्रपूर जिल्हा समन्वयक डॉ. गुरुदास बल्की आणि गडचिरोली जिल्हा समन्वयक डॉ. प्रदीप चापले यांनी, अनुदान वितरण, अंकेक्षण व प्रलेखे अहवाल, स्वयंसेवक नोंदणी, विशेष शिबिरांचे आयोजन तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांमध्ये स्वयंसेवक व कार्यक्रम अधिकार्‍यांचा सहभाग याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. गुरुदास बल्की यांनी केले. संचालन डॉ. कुलदीप गोंड यांनी केले, तर आभार डॉ. पुरुषोत्तम माहोरे यांनी मानले.