वॉशिंग्टन,
khameneis memorial अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यविधीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा खळबळजनक विधान केले आहे. एका मुलाखतीत बोलताना ट्रम्प यांनी दावा केला की, इराणचे उर्वरित नेतृत्व एकाच गोळीने संपविणे शक्य आहे. मात्र, तसे केल्यास भविष्यात चर्चा किंवा वाटाघाटी करण्यासाठी कोणीही उरणार नसल्याने असा निर्णय घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ट्रम्प यांनी 'ॲक्सिऑस'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, इराणमधील सर्व महत्त्वाचे नेते एकाच ठिकाणी आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करणे अवघड नाही. तरीही अमेरिका तसे करणार नाही, कारण भविष्यातील करारासाठी संवादाचे दार खुले ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, इराण एका करारासाठी प्रयत्नशील असल्याचाही दावा त्यांनी केला.

याच मुलाखतीत ट्रम्प यांनी आणखी एक दावा करत सांगितले की, अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यविधीचे सोहळे पूर्ण होईपर्यंत अमेरिका आणि इराण या दोन्ही बाजूंनी सुमारे आठवडाभर कोणतीही लष्करी कारवाई न करण्याचे आणि वाटाघाटींनाही तात्पुरती स्थगिती देण्याचे ठरवले आहे. दरम्यान, खामेनी यांच्या अंत्यदर्शनासाठी आणि अंत्यविधीसाठी लाखो नागरिक रस्त्यावर उतरले होते. शनिवारी झालेल्या शोकसभेत इराणचे संसद अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची भावूक झाल्याचे दिसून आले. यावर प्रतिक्रिया देताना ट्रम्प यांनी आश्चर्य व्यक्त केले. लोकांना खामेनींबद्दल तीव्र नाराजी असल्याचे आपण समजत होतो, असे सांगत त्यांनी उपरोधिकपणे, "कदाचित हे खोटे अश्रू असतील," अशी टिप्पणी केली.
इराणवर तब्बल ३६ वर्षे नेतृत्व करणाऱ्या अयातुल्ला अली खामेनी यांची यंदा २८ फेब्रुवारी रोजी हत्या झाली होती. त्याच दिवशी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हवाई हल्ले केल्याने मध्य-पूर्वेतील संघर्ष अधिक तीव्र झाला. युद्धजन्य परिस्थितीमुळे इस्लामिक परंपरेनुसार २४ तासांत होणारा दफनविधी पुढे ढकलण्यात आला. इराणने खामेनी यांच्या अंत्यसंस्कारासाठी ४ जुलै ही तारीख निश्चित केली. विशेष म्हणजे, हा दिवस अमेरिकेच्या स्थापनेच्या २५० व्या वर्धापन दिनाशीही जुळून आला. अंत्यविधीची प्रक्रिया ४ जुलैपासून सुरू झाली असून ७ जुलै रोजी तेहरानच्या दक्षिणेकडील पवित्र शहर कोम येथे धार्मिक विधी पार पडणार आहेत. त्यानंतर ९ जुलै रोजी अयातुल्ला अली खामेनी यांना त्यांच्या मूळ गावी मशहद येथे दफन करण्यात येणार आहे.