मुंबई
vasai rain news वसई आणि नालासोपारा परिसरात गेल्या काही तासांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून अनेक सखल भागांत पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. वसई पूर्वेतील मांगुळीपाडा आणि भोईदापाडा परिसरात पुराच्या पाण्यात ५० वर्षीय व्यक्ती वाहून गेल्याची घटना घडली आहे. स्थानिक नागरिकांनी संबंधित व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र नाल्याच्या पाण्याचा प्रवाह प्रचंड वेगवान असल्याने त्यांना यश आले नाही.
ही घटना दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. नाल्यात आलेल्या पुरात किशोर नामदेव लोखंडे हे वाहून गेल्याची माहिती समोर आली असून नागरिकांनी त्यांना वाचविण्यासाठी धाव घेतली होती. मात्र काही क्षणांतच ते पाण्यात बुडून बेपत्ता झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि संबंधित यंत्रणांचे पथक बोटीच्या साहाय्याने घटनास्थळी दाखल झाले असून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेबाबत किशोर लोखंडे यांच्या पत्नी रमा लोखंडे यांनी प्रशासनाच्या मदतीचा उल्लेख करत पतीचा अद्याप शोध लागलेला नसल्याचे सांगितले आहे. किशोर आणि रमा लोखंडे हे मूळचे रत्नागिरीचे रहिवासी असून सध्या भाड्याच्या घरात राहत असल्याची माहितीही समोर आली आहे. या दुर्घटनेनंतर कुटुंबीय आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी उपस्थित असून प्रशासनाकडून शोधकार्य सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
वसई-विरार शहरात गेल्या २४ तासांपासून vasai rain news सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. विविध भागांत झाडे कोसळणे, वाहने वाहून जाणे तसेच घरांचे नुकसान झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या पावसामुळे मधुबन टाऊनशिपमधील ठाकूर स्कूलमध्ये नोकरीवर गेलेले ४१ शिक्षक अडकले होते. मात्र प्रशासन आणि बचाव पथकाच्या संयुक्त प्रयत्नांनंतर सर्व शिक्षकांची सुखरूप सुटका करण्यात आली आणि त्यांना वसई रेल्वे स्थानकापर्यंत सुरक्षित पोहोचविण्यात आले. या बचाव मोहिमेत स्थानिक पातळीवरही मदतकार्य करण्यात आले असून सर्व शिक्षकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पायाभूत सुविधांचे नुकसानही समोर येत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव नाल्यावरील पुलावरील डांबर पहिल्याच मुसळधार पावसात वाहून गेल्याची घटना घडली आहे. सिंधी गावाजवळील कुंभा रोडवरील नव्याने बांधलेल्या पुलावर खडी उघडी पडल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ग्रामस्थांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला असून संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन पुन्हा एकदा केले आहे.