आर्मी, एनसीसी अधिकार्यांच्या सतर्कतेने इसमाचा जीव वाचला

एनसीसीच्या ‘एकता और अनुशासन’ ब्रिद वाक्यानुसार मदतीचा हात

    दिनांक :05-Jul-2026
Total Views |

वर्धा,

wardha rescue operation बापूरावजी देशमुख फाउंडेशनच्या वसतिगृह परिसराच्या मागे असलेल्या शेतातील विहिरीत पडलेल्या एका इसमाचा जीव वाचवण्यात ३ महाराष्ट्र गर्ल्स बटालियनच्या प्रशासकीय अधिकारी व आर्मी स्टाफच्या सतर्कतेने यश मिळाले.
 

wardha rescue operation 
शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान शेतमजूर जीवन ताकसांडे (५५) हे काही कामानिमित्त विहिरीजवळ गेले असता अचानकपणे त्यांचा पाय घसरून ते विहिरीत पडले. मुसळधार पाऊस सुरू होता त्यामुळे त्यांचा आवाज कोणालाही आला नाही. त्यांना विहिरीतच रात्र काढावी लागली. त्यांना पोहणे येत असल्यामुळे विहिरीतील एका पाईपला पकडून आपला जीव कसाबसा वाचवला. जवळपास १८ तासानंतर ३ जुलै रोजी बापूराव देशमुख फाउंडेशनच्या वसतिगृह परिसरात असलेल्या महिला कमरुनिसा पठाण हिला त्यांचा आवाज ऐकू आला व त्यांनी विहिरीत पाहिल्यानंतर एक इसम तिच्या नजरेस पडला. तिने त्वरित परिसरात सुरू असलेल्या एनसीसी छावणीशी संपर्क साधला. त्यावेळी शिबिराच्या उपप्रमुख तथा ३ महाराष्ट्र गर्ल्स बटालियनच्या प्रशासकीय अधिकारी मेजर रिजू रावत यांनी त्वरित सहअधिकार्यांसोबत धाव घेतली. अध्र्या तासाच्या आत सदर इसमाला बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले.
यावेळी सुबेदार मेजर चंद्रभान सिंग, परिचालक विशाल तुळशीकर, हवालदार गंगाधर जंगले, नायक गणेश डोईफोडे व वसतिगृह कर्मचारी अनिल मानकर उपस्थित होते.
मजूर जीवन ताकसांडे यांनी ५ रोजी वर्धा एनसीसी बटालियनचे अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर यांच्याशी बोलताना सांगितले की, अठरा तास मी मृत्यूशी झुंज देत होतो. माझे दोन्ही पाय पांढरे येऊन गेले होते. कदाचित अजून दोन-चार तास उशीर झाला असता तर माझा मृत्यू निश्चित होता, असेही ताकसांडे यांनी सांगितले.
सदर घटनेबाबत ३ महाराष्ट्र गर्ल्स बटालियनच्या कमान अधिकारी कर्नल प्रीती तिवारी यांनी घटनास्थळी जाऊन आढावा घेतला व आपल्या अधिकारी व कर्मचार्यांची प्रशंसा केली. या घटनेबाबत नागपूर विभागीय ग्रुप कमांडर ग्रुप कॅप्टन खुशाल व्यास यांनी सदर आपत्ती व्यवस्थापनांतर्गत इसमाचा जीव वाचवल्याबद्दल बटालियन व अधिकार्यांचे अभिनंदन केले.