रस्त्याच्या छातीतून उसळला पाण्याचा स्फोट

तळेगावमध्ये पाइपलाइन चाचणीने उघड केली विकासकामांची धक्कादायक खरी बाजू

    दिनांक :05-Jul-2026
Total Views |
पुणे
water pipeline bursts पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे विकासकामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील डांबरी रस्त्याच्या मधून अचानक पाण्याचा प्रचंड फवारा उसळल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. रस्ताच फुटला की काय, असा भास निर्माण करणारी ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, रस्त्याखालून टाकण्यात आलेल्या पाणीपुरवठा पाइपलाइनच्या कामातील गंभीर निष्काळजीपणा यामुळे उघड झाला आहे.
 

 water pipeline bursts 
दीड वर्षांपूर्वी तळेगाव दाभाडे शहरात पाणीपुरवठा योजनेअंतर्गत रस्त्याखालून नवीन पाइपलाइन टाकण्यात आली होती. त्यानंतर संबंधित रस्त्याचे डांबरीकरणही करण्यात आले. पुढील आठवड्यात या योजनेचे उद्घाटन करण्याचे नियोजन होते. त्याआधी नगरपरिषदेकडून शनिवारी नव्याने उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीतून पाइपलाइनची चाचणी घेण्यासाठी पाणी सोडण्यात आले. मात्र चाचणी सुरू होताच काही क्षणांतच रस्त्याच्या मधून पाण्याचा मोठा फवारा उसळला. त्यामुळे रस्ता फुटल्याचा भास निर्माण झाला आणि उपस्थित नागरिक घाबरले.
घटनेनंतर करण्यात आलेल्या तपासणीत धक्कादायक बाब समोर आली. पाइपलाइनची जोडणी करताना संबंधित कंत्राटदाराने दोन पाइप एकमेकांना जोडलेच नसल्याचे आढळून आले. याच निष्काळजीपणामुळे चाचणीदरम्यान ही घटना घडल्याचा आरोप संबंधित कंत्राटदारावर करण्यात येत आहे.
 
 
या प्रकरणाची गंभीर water pipeline bursts दखल घेत तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दपकेकर यांनी संबंधित कंत्राटदाराकडूनच पाइपलाइन दुरुस्ती तसेच रस्त्याच्या पुनर्बांधणीचा संपूर्ण खर्च वसूल करण्यात येणार असल्याची माहिती दिली. या घटनेमुळे तळेगावमधील विकासकामांचा दर्जा आणि कंत्राटदारांच्या कामकाजाची गुणवत्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
पावसाळ्यात विविध ठिकाणी रस्ते खचल्याच्या घटना घडत असताना, ही घटनाही सुरुवातीला पावसामुळे घडल्याचे नागरिकांना वाटले. मात्र तपासणीनंतर प्रत्यक्ष कारण समोर आल्यानंतर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटनेच्या वेळी काही नागरिक त्या रस्त्यावरून जात असल्याचेही दिसत आहे. ही घटना एखाद्याच्या जीवावर बेतली असती तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, नगरपरिषद प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुढील कारवाई सुरू केली आहे.