पदार्पणाची बातमी मिळताच वैभवने सर्वात आधी कोणाला दिला फोन?

    दिनांक :05-Jul-2026
Total Views |
मँचेस्टर,
whom did vaibhav call first upon receiving भारतीय क्रिकेटमधील युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीसाठी ४ जुलै २०२६ हा दिवस आयुष्यभर स्मरणात राहणारा ठरला. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात त्याने भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत इतिहास रचला. अवघ्या १५ वर्षे आणि ९९ दिवसांच्या वयात भारताचे प्रतिनिधित्व करणारा तो सर्वात युवा क्रिकेटपटू ठरला. यासह त्याने १९८९ मध्ये १६ वर्षे आणि २०५ दिवसांच्या वयात आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या सचिन तेंडुलकर यांचा विक्रम मागे टाकला.
 
vaibhav
 
सामन्यापूर्वी भारतीय संघाचे उपकर्णधार तिलक वर्मा यांनी वैभवला पदार्पणाची कॅप प्रदान केली. या विशेष क्षणाचा व्हिडिओ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोशल मीडियावर शेअर केला असून त्यामध्ये वैभवने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पदार्पणाची कॅप स्वीकारल्यानंतर वैभव म्हणाला की, भारतीय संघाकडून खेळणे हे त्याचे बालपणापासूनचे स्वप्न होते. देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे हा कोणत्याही क्रिकेटपटूसाठी सर्वात मोठा सन्मान असल्याचे तो म्हणाला. हा क्षण आपल्या आयुष्यातील सर्वात अभिमानास्पद असल्याची भावना त्याने व्यक्त केली.
 
वैभवने सांगितले की, भारतीय संघात पदार्पणाची माहिती मिळाल्यानंतर त्याने सर्वप्रथम आपल्या वडिलांना ही आनंदाची बातमी दिली. त्याचे वडील त्याच्यासोबत मँचेस्टरमध्येच असल्याने तो थेट त्यांच्या खोलीत गेला. त्यानंतर त्याने आईला आणि त्याचे प्रशिक्षक रोमी भिंदर यांना ही माहिती दिली. वडिलांनी त्याला कोणताही दबाव न घेता नेहमीप्रमाणे आत्मविश्वासाने खेळण्याचा सल्ला दिला आणि स्वतःच्या खेळावर विश्वास ठेवण्यास सांगितल्याचे वैभवने सांगितले.
 
यावेळी तिलक वर्मा यांनीही वैभवचे अभिनंदन करत त्याच्यासह त्याच्या कुटुंबाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, ही कॅप त्याने आपल्या मेहनत आणि गुणवत्तेच्या जोरावर मिळवली आहे. निर्भयपणे खेळ, योग्य मानसिकतेने मैदानात उतर आणि प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशी कामगिरी कर, असा संदेश देत त्यांनी कॅप क्रमांक १२२ वैभव सूर्यवंशीला सुपूर्द केली. पदार्पणाच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने १० चेंडूंत १४ धावा केल्या. त्याच्या खेळीत दोन षटकारांचा समावेश होता. फलंदाजीबरोबरच क्षेत्ररक्षणातही त्याने एक झेल घेत आपल्या पहिल्याच सामन्यात लक्षवेधी कामगिरी केली.