‘Asiatic Society of Mumbai’ देश-विदेशातील समृद्धतेने नटलेल्या ज्ञानपरंपरेचा प्रामाणिक प्रसार व्हावा, सांस्कृतिक ठेवा म्हणून ज्यांची ओळख असते, त्या अमूल्य ग्रंथसंपदेचे जतन, संवर्धन व्हावे आणि ‘सकल जनांसि’ शहाणे करून सोडणाऱ्या वाचनसंस्कृतीचा वसा जपण्याच्या परंपरेच्या वारीमध्ये अधिकाधिक लोकांस सहभागी करून घ्यावे, या व्रतापासून काहीसे भरकटल्याची गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील ‘एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’ या नामांकित संस्थेच्या कारभाराबाबत व्यक्त होणारी खंत आता दूर झाली आहे. ज्ञानप्रसार, ज्ञानसंवर्धन, संपूर्ण समाजाचे सांस्कृतिक नेतृत्व, संशोधनातील उत्कृष्टता आणि सार्वजनिक बौद्धिक जीवनाच्या परंपरेचे पुनरुज्जीवन करण्याच्या ध्यासाचे नवे पर्व या संस्थेत सुरू होऊ घातले आहे. तब्बल सुमारे सव्वादोनशे वर्षांपूर्वी, एकोणीसाव्या शतकाच्या प्रारंभी स्थापन झालेल्या, मुंबईचा मानबिंदू मानल्या जाणाऱ्या या संस्थेने ज्ञानप्रसाराची पालखी खांद्यावर वाहिली, पण पुढच्या वैचारिक वाटचालीत काळाच्या प्रत्येक पावलासोबत त्या पालखीतील नामवंतांच्या पाऊलखुणा मात्र काळवंडत गेल्या.
‘एशियाटक सोसायटी ऑफ मुंबई’ या ऐतिहासिक संस्थेच्या कारभारावर चढलेली एकांगीपणाची, आर्थिक बेशिस्तीची पुटे आणि समाजापासून स्वतःस दूर राखून आपले वैचारिक वेगळेपण जपण्याच्या मूठभरांच्या मानसिकतेची जळमटे आता दूर होणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या माध्यमांचा आधार घेत, आणि प्रसंगी न्यायालयाचे उंबरठे झिजवत संस्थेवरील मक्तेदारी शाबूत ठेवण्याचे हरतऱ्हेचे प्रयत्न करणाऱ्या काही ठरावीकांच्या कंपूने, ज्ञान ही एका विशिष्ट विचारसरणीची मक्तेदारी असल्याच्या आविर्भावात अन्य विचारसरणींच्या प्रवेशबंदीसाठी केलेल्या मोर्चेबांधणीचे कुंपण तोडून ही संस्था आता विचारस्वातंत्र्याच्या मुक्त पुरस्कारासाठी सिद्ध झाली आहे. ‘एशियाटिक सोसायटी वाचवा’ असा टाहो फोडत, आपली संस्थेवरील पकड टिकविण्याचे जिवापाड प्रयत्न करताना अन्य विचारसरणींना अक्षरशः अस्पृश्य ठरविणाऱ्या तथाकथित पुरोगामीत्वाचा बुरखादेखील आता टराटरा फाटला आहे, आणि येथील ज्ञानभांडार आता सहजपणे सर्वसामान्यांसाठी खुले होणार या जाणिवेने या समृद्ध संस्थेमधील ग्रंथसंपदा सुखावली आहे. संस्थेच्या कारभारावरील पकड सुटण्याच्या भीतीने वैचारिक अस्पृश्यतेचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पुरस्कार करणाऱ्या, आणि संस्था उजव्या विचारसरणीच्या ताब्यात जाण्याची अनाकलनीय भीती समाजात रुजविण्याकरिता उपलब्ध सर्व प्रसारस्रोतांचा आधार घेणाऱ्या कथित पुरोगामी कंपूने संस्थेचे राजकीयीकरण होत असल्याचा कांगावा करीत संस्थेला वाचविण्याचा घेतलेला पवित्रा किती बेगडी होता, हे निवडणुकांच्या काळातील न्यायालयीन लढ्यात वेळोवेळी उघड होत गेले होते. आपले वैचारिक वर्चस्व टिकविण्यासाठी आणि एकाच विचाराची पालखी मिरविण्याच्या अट्टहासापोटी गेल्या काही महिन्यांत एशियाटिक सोसायटीच्या निवडणुकीच्या निमित्ताने जे काही घडले, त्यामुळे मुंबईचेच नव्हे, तर महाराष्ट्राचे बौद्धिक वातावरण पुरते गढुळले होते.
वाचनसंस्कृतीचा प्रामाणिक प्रसार करावयाचा असेल, समृद्ध ज्ञानपरंपरेचा वारसा प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचवायचा असेल, तर या व्रतापासून वंचित राहिल्यामुळे दूर असलेल्या अनेकांस सोबत घ्यावे लागते. एशियाटिक सोसायटी नावाच्या या संस्थेस मात्र, हा समृद्ध वारसा लोकांपर्यंत पोहोचूच नये अशा अलिप्त मानसिकतेचा विळखा वर्षानुवर्षे पडून राहिल्याने, असंख्य ज्ञानपिपासूंना संस्थेचा उंबरठादेखील ओलांडताच येत नव्हता, असा आरोप केला जातो. कदाचित त्यामुळेच, संस्थेच्या सदस्यांची संख्या एका गोतावळ्यापलीकडे पोहोचणारच नाही याची खबरदारी घेण्याची प्रथा रुजली आणि कालपरवापर्यंत या प्रथेचे पालन करणाऱ्या पाईकांनी संस्थेच्या कारभारात अनेक बेकायदा कृत्यांचा आधार घेतल्याचेही अनेकदा उघडकीस आले. ‘एशियाटिक बचाव’ हा या निवडणुकीच्या निमित्ताने दिला गेलेला अशा काही पाईकांचा नारा होता, पण प्रत्यक्षात मात्र, एशियाटिकमधील अस्तित्व वाचविण्याची ती धडपड होती, असेही वेगवेगळ्या वेळी उघड होत गेले. अखेर या एकांगी मक्तेदारीच्या हट्टापायीच एशियाटिक सोसायटी नावाच्या या संस्थेला आपल्या उद्याच्या मुक्त अस्तित्वभयाची जाणीव झाली असावी. त्यामुळेच, कालपरवापर्यंतची ‘कब्जा राखण्याची’ धडपड आता इतिहासजमा झाली असून ‘एशियाटिक टुमॉरो’ नावाच्या गटाच्या झेंड्याखाली एकत्र आलेल्या तळमळीच्या कार्यकर्त्यांनी या संस्थेची मुक्तता केली आहे.
मानवी इतिहासात ज्या ज्या सभ्यता महान ठरल्या, त्या सर्वांनी ज्ञानसंचयाला सर्वोच्च स्थान दिले. प्राचीन इजिप्तमधील अलेक्झांड्रिया ग्रंथालय हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. जगभरातून हजारो हस्तलिखिते तेथे जमा करण्यात आली होती. जगातील जवळजवळ प्रत्येक ज्ञात ज्ञानशाखेचे प्रतिनिधित्व त्या ग्रंथालयात होते. परंतु जेव्हा त्या ग्रंथालयाचा विनाश झाला, तेव्हा केवळ इमारत जळाली नाही, तर मानवजातीच्या सामूहिक स्मृतीचा एक मोठा भाग कायमचा नष्ट झाला. म्हणूनच, काही युद्धांपेक्षा अलेक्झांड्रिया ग्रंथालयाचा विनाश हा मानवजातीसाठी अधिक मोठा धक्का होता, असे काही इतिहासकार मानतात. भारताची परंपराही याला अपवाद नाही. नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला अशा विद्यापीठांनी जगभरातील विद्यार्थ्यांना आकर्षित केले. नालंदाच्या ग्रंथालयास लागलेली आग हा भारताच्या अनेक शतकांच्या ज्ञानपरंपरेवर उमटलेला एक असह्य घाव होता. म्हणूनच ग्रंथांचा नाश म्हणजे संस्कृतीच्या स्मृतीवर घाला असे मानले जाते. आज कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल माध्यमे आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या माहितीच्या युगात आपण जगत असलो, तरी ज्ञानाचे शाश्वत स्वरूप बदललेले नाही. म्हणूनच कोणत्याही समाजाचे बौद्धिक सामर्थ्य मोजायचे असेल, तर त्या समाजातील ग्रंथालये, ग्रंथसंग्रह आणि वाचनसंस्कृती यांकडे पाहावे लागते. ज्या समाजात वाचनसंस्कृती मजबूत असते, त्या समाजातील संवाद अधिक सुसंस्कृत असतो, मतभेद अधिक विवेकी असतात आणि त्या समाजात उभी राहिलेली लोकशाही अधिक परिपक्व असते. ग्रंथसंस्कृतीशी मैत्री करणारा समाज हिंसा, अंधश्रद्धा, असहिष्णुता आणि अफवांच्या प्रभावाखाली सहज वाहवत जात नाही. ग्रंथ म्हणजे केवळ अक्षरांची मांडणी नव्हे; ते काळाच्या कप्प्यात जपलेले, आणि अनुभवाच्या आधाराने सिद्ध झालेल्या विचारांचे भांडार असतात. अशा विचारांनी समृद्ध असणारा ग्रंथसंग्रह म्हणजे कपाटात रचलेली पुस्तके नसून ती एका समाजाच्या सांस्कृतिक परिचयाची जपणूक असते, आणि ग्रंथालय म्हणजे केवळ इमारत नसून समाजाच्या सभ्यतेचे चिन्ह असते. म्हणूनच ग्रंथांचे जतन ही केवळ सांस्कृतिक जबाबदारी नाही, तर भावी पिढ्यांना वैचारिकदृष्ट्या सुसंस्कृत व समृद्ध करण्याकरिता असलेली ऐतिहासिक आणि नैतिक बांधिलकी असते.
‘Asiatic Society of Mumbai’ केवळ नवीन पुस्तके प्रकाशित करून ही बांधीलकी पूर्ण होत नाही, तर दुर्मीळ ग्रंथांचे वैज्ञानिक संवर्धन, हस्तलिखितांचे डिजिटायझेशन, सार्वजनिक ग्रंथालयांचे आधुनिकीकरण ही आजच्या काळाची मुख्य गरज आहे. कारण ग्रंथालये ही केवळ पुस्तकांची गोदामे नाहीत. ती समाजाच्या बौद्धिक आरोग्याची केंद्रे आहेत. ज्या समाजातील ग्रंथालये गजबजलेली असतात, त्या समाजातील कारागृहे तुलनेने रिकामी असतात, असे म्हटले जाते. म्हणूनच, एशियाटिक सोसायटीला पुन्हा एकदा समाजाभिमुख करण्याची आणि सांस्कृतिक संपन्नतेचे चिन्ह असलेल्या या संस्थेच्या समृद्धीच्या सहवासाकरिता आतुरलेल्या सर्वांकरिता या संस्थेचे दरवाजे मुक्तपणे खुले करण्याची गरज होती. ‘एशियाटिक टुमारो’ नावाच्या गटातील कार्यकर्त्यांनी ही गरज नेमकी ओळखली आणि त्यासाठी जिवापाड मेहनत घेतली. संस्थेच्या भविष्याचा एका सुनियोजित आराखडा तयार केला, मतदारांसमोर प्रामाणिकपणे मांडला, आणि संस्थेच्या सावलीत फोफावलेल्या वैचारिक अस्पृश्यतेला तिलांजली देण्याची ग्वाही देत हे कार्यकर्ते सज्ज झाले. विद्या आणि ज्ञान हे आढ्यताखोरांच्या अंमलाखाली राहिले, तर समाजापासून फटकून राहते, असे म्हणतात. पण ते समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले, तर त्याची शोभा अधिक वाढते ही संस्कृतीची शिकवण आहे. म्हणूनच, ‘विद्या विनयेन शोभते’ असा सुंदर सुविचार संस्कृतात रूढ आहे. ‘एशियाटिक’मधील परिवर्तनाची प्रक्रिया सुरू असताना याचा प्रत्यय ज्यांना आला, त्या मतदारांनी परिवर्तनाच्या बाजूने कौल दिला आहे, असा एशियाटिक सोसायटीच्या भविष्याच्या वाटचालीचा अर्थ आहे.
आज आपण आर्थिक विकास, तांत्रिक प्रगती आणि जागतिक स्पर्धेबद्दल बोलतो; पण या सर्वांचा पाया ज्ञान आहे. ज्ञानाचा पाया वाचन आहे आणि वाचनाचा पाया ग्रंथ आहेत. त्यामुळे ग्रंथांचे संरक्षण, ग्रंथालयांचे संवर्धन आणि वाचनसंस्कृतीचा प्रसार हे कोणत्याही राष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणाचे केंद्रबिंदू असले पाहिजेत. राजकीय पक्षांच्या प्रभावापासून अलिप्त राहून संस्थेच्या सर्वांगीण परिवर्तनाची ग्वाही देत संस्थेचा कार्यभार नव्याने हाती घेणाऱ्या या कार्यकर्त्यांसमोर हे एक आव्हान आहे. कारण त्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती आणि अंमलबजावणीसाठी शक्य ते सारे पणाला लावण्याची तयारी गरजेची आहे. संस्थेची सुंदर इमारत आणि त्या इमारतीच्या दरवाजापर्यंत घेऊन जाणारी प्रत्येक पायरी म्हणजे केवळ सेल्फी पॉईंट किंवा चित्रपट-मालिकांमधील प्रेमप्रसंगांच्या पार्श्वभूमीचा देखावा नव्हेत, तर ज्ञानप्राप्तीच्या प्रकाशवाटा आहेत. त्या अधिक उजळाव्यात आणि संस्थेचे पावित्र्य अधिक तेजस्वीपणे समाजाला दिशा देत रहावे, याकरिता कार्यबद्ध राहण्यासाठी नव्या चमूस शुभेच्छा!