बालभारती पुस्तके पडली तोकडी

१५०० पाठ्यपुस्तकांची पूरक मागणी

    दिनांक :06-Jul-2026
Total Views |
शिक्षण विभागाची तारांबळ
 
 
गेल्या वर्षी २० हजार पुस्तके कमी
 
नागपूर,
balbharati textbooks जिल्हा परिषदेच्या शाळा ३० जूनला सुरू झाल्या. पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात आल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे. सध्या पाठ्यपुस्तकांचे वितरण अंतिम टप्प्यात आहे. मात्र विद्यार्थी संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन बालभारतीकडे दीड हजार अतिरिक्त पुस्तकांची पूरक मागणी पाठवण्यात आली आहे.
 
 
balbharati textbooks
 
जिल्हा परिषदेच्या पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. या वर्षासाठी पहिली ते पाचवीच्या ३ लाख ९४ हजार आणि सहावी ते आठवीच्या ५ लाख २ हजार ८२० अशा एकूण ८ लाख ९६ हजार ८२० पुस्तकांची मागणी बालभारतीकडे करण्यात आली होती. शिक्षण विभागाच्या म्हणण्यानुसार मागणी केलेल्या संख्येइतकी पुस्तके प्राप्त झाली आहेत आणि वितरण सुरू आहे.
 
पूरक मागणी का?
शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शाळा सुरू झाल्यानंतर नव्याने प्रवेश घेणारे विद्यार्थी, स्थलांतरित विद्यार्थी आणि आकडेवारीतील तफावत यामुळे काही शाळांमध्ये पुस्तके कमी पडू शकतात. ‘कोणताही विद्यार्थी एकाही विषयाच्या पुस्तकापासून वंचित राहू नये‘ या उद्देशाने बालभारतीकडे सुमारे १००० ते १५०० पुस्तकांची पूरक मागणी पाठवण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने गणित, मराठी आणि इंग्रजी या विषयांच्या पुस्तकांचा समावेश आहे.
 
 
अधिकाऱ्यांचा दावा, पण आकडा अपूर्ण
यंदा मात्र अशी वेळ येणार नाही, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे. ‘पहिल्याच दिवशी ९० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पुस्तके दिली आहेत. उर्वरित वितरण १० दिवसांत पूर्ण होईल‘ असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मात्र अद्याप शाळानिहाय विद्यार्थी संख्येचा अंतिम आकडा विभागाकडे आलेला नाही. सर्व शाळांमधून माहिती आल्यानंतरच नेमके किती विद्यार्थी आहेत आणि सर्वांना पुस्तके मिळाली आहेत की नाही हे स्पष्ट होईल.
गेल्या वर्षीचा अनुभव धडा देणारा
गेल्या वर्षी शिक्षण विभागाचे नियोजन चुकल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती. विद्यार्थी संख्या वाढल्याचे कारण देत सुमारे २० हजार पुस्तके कमी पडली होती. तेव्हा शिक्षण संचालनालयाने पूरक मागणी पूर्ण करण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे अखेर ज्या विद्यार्थ्यांकडे नवीन पुस्तके होती त्यांच्याकडून वर्षाच्या मध्यात जुनी पुस्तके परत घेऊन ती पुस्तकांपासून वंचित विद्यार्थ्यांना द्यावी लागली. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला होता.