बंगालच्या उपसागराने महाराष्ट्र खवळला!

मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, प्रशासन सतर्क

    दिनांक :06-Jul-2026
Total Views |
मुंबई,
Bay of Bengal stirred up Maharashtra बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे डिप्रेशनमध्ये रूपांतर झाल्याने त्याचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होत आहे. या बदलामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसासोबत ताशी ९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन मुंबईसाठी ऑरेंज अलर्टऐवजी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून राज्य प्रशासनही पूर्णपणे सज्ज झाले आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात माहिती देताना नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले. हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र होत डिप्रेशनमध्ये बदलले आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या प्रणालीचा प्रभाव कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात जाणवत असून, मुंबई आणि आसपासच्या भागात वाऱ्यांचा वेग ताशी ९० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो.
 
 
bangak
 
 
मुंबईसोबतच पुणे, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांनाही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसासोबतच वेगवान वाऱ्यांमुळे झाडे उन्मळून पडणे, वाहतुकीवर परिणाम होणे आणि सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांनी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. अतिवृष्टी, पूरस्थिती आणि संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यातील सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.