वारकऱ्यांनो... देहू-आळंदीला जाऊ नका!

मुख्यमंत्र्यांचे मोठे आवाहन

    दिनांक :06-Jul-2026
Total Views |
मुंबई,
Chief Minister's appeal to Warkaris राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरीच्या वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांना विशेष आवाहन केले आहे. इंद्रायणी नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने देहू आणि आळंदीला जाण्याचा आग्रह धरू नका, थेट पुण्यात पोहोचा, असे आवाहन त्यांनी केले. सध्याची परिस्थिती धोकादायक असल्याने वारकऱ्यांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत पूरस्थिती, दरडी कोसळणे आणि जोरदार वाऱ्याच्या घटना घडत आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांना आणि वारकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला.
 
 

वारी 
 
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, वारी १० तारखेला पुण्यात पोहोचणार आहे. मात्र, इंद्रायणी नदीवरील चारही पूल पाण्याखाली जात असल्याने देहू आणि आळंदी परिसरात जाणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे वारकऱ्यांनी थेट पुण्यात पोहोचून पुढील प्रवास करावा, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मुंबईत  मोठ्या भरतीचा (हायटाइड) इशारा देण्यात आला आहे. यावेळी शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता असून, जोरदार वाऱ्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या चार दिवसांत मुंबईत महिनाभराएवढा पाऊस झाला असून, काल ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहिले. या वाऱ्यामुळे शहरात साडेतीनशेहून अधिक झाडे कोसळल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. नाशिकमध्येही हवामान विभागाने मोठा इशारा दिला आहे. येथे ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून सुमारे ३०० मिलिमीटर पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे नाशिकमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली असून प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
 
 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, ८ तारखेपर्यंत राज्यात हवामानाचा धोका कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि अनावश्यक प्रवास टाळावा. विशेषतः धबधबे, घाट परिसर आणि पावसाळी पर्यटनस्थळांवर जाणे टाळण्याचे आवाहन त्यांनी तरुणांना केले. राज्य सरकारचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून सर्व जिल्हा प्रशासनांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. धोकादायक भागांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविणे, पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे, पाण्यात अडकलेल्या वाहनांना बाहेर काढणे आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच गेल्या काही दिवसांतील पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आणि मदतकार्याचा सविस्तर अहवाल लवकरच सादर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.