नाशिक,
Cloudburst warning for Nashik राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक जिल्ह्याबाबत विशेष सतर्कतेचा इशारा दिला आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर दरम्यानच्या भागात संभाव्य ढगफुटीचा धोका लक्षात घेता प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून, "नाशिकवर आमची करडी नजर असेल," असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात मोठ्या प्रमाणावर ढगफुटी होण्याची शक्यता आहे. या भागात सुमारे ३०० मिलिमीटर पावसाची नोंद होऊ शकते. त्यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यातील विविध भागांमध्ये निर्माण होणाऱ्या संभाव्य पूरस्थिती आणि इतर आपत्तींचा विचार करून प्रशासनाने आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
संभाव्य संकट लक्षात घेऊन नाशिक जिल्हा परिषद आणि स्थानिक प्रशासनानेही यंत्रणा सज्ज केली आहे. घाटमाथा परिसरासाठी हवामान विभागाने रेड अलर्टचा इशारा दिल्यानंतर ग्रामीण भागातील परिस्थितीनुसार शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांना २४ तास सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. नदीकाठच्या गावांमध्ये पूर, दरड कोसळणे किंवा इतर कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास त्याची माहिती तातडीने प्रशासनापर्यंत पोहोचवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.दरम्यान, राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा कायम आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला असून अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.