नपच्या पाणी पुरवठा योजनेवर जास्त क्षमतेचा सोलर प्लॅन्ट कमी करा

    दिनांक :06-Jul-2026
Total Views |
वर्धा,
congress वर्धा नगर परिषद मार्फत वर्धा शहरात पाणी पुरवठा करण्याकरिता पवनार पंप्पींग स्टेशनवर अंदाजे ६.५० कोटीचा सोलर प्लॅन्ट लावण्यात येत आहे. त्या प्लॅन्टवर निर्माण होणार्या युनिटचा वीज वितरण कंपनीलाच फायदा होणार आहे. त्यामुळे नगर पालिकेने पवनार येथे लावण्यात येणार्या प्लॅन्ट कमी करून इतरत्र लावण्यात यावा या मागणीचे निवेदन काँग्रेसचे नेते शेखर शेंडे आणि प्रवीण हिवरे यांनी मुख्याधिकारी विजय देशमुख यांना दिले.
 

congress demands reduction in solar plant capacity for wardha water supply project 
 
 
पवनार येथील सोलर प्लॅन्टमुळे अंदाजे दीड लाख युनिट निर्माण होईल. परंतु, विद्युत विभागाच्या नवीन नियमानुसार सकाळी ७ ते रात्री ७ वाजेपर्यंत जेवढी वीज लागते तेवढीच वीज सौरउर्जेवर जनरेट झालेल्या विजेमधून घेता येते. उर्वरित वीज विनामुल्य विद्युत विभागाला द्यावी लागते. या सकाळच्या कालावधीमध्ये सदर पाणीपुरवठा योजनेकरिता अंदाजे ५० हजार युनिट विजेचा वापर सध्या होत आहे. उर्वरीत अंदाजे १ लाख युनिट एम.एस.ई.बी.ला विनामुल्य द्यावे लागणार आहेत. मात्र, सदर सोलर प्लॅन्टवरून जनरेट होणार्या विजेवर अंदाजे १.८० ग्रीड चार्ज एम.एस.ई.बी. ला भरावा लागणार आहे. या करीता जास्त क्षमतेचा सोलर प्लॅन्ट उभारणी करीता एम.एस.ई.बी.ने अजूनही मंजुरी दिली नाही. त्यानंतरही ठेकेदाराला ३ कोटीहून अधिक अॅडव्हान्स दिलेला आहे. जेवढे पवनार पंप्पीग स्टेशनवर सकाळी ६ ते रात्री ७ पर्यंत जेवढ्या विजेची नगर परिषदला आवश्यक आहे तेवढ्याच क्षमतेचा सोलर प्लॅन्ट तेथे लावावा. उर्वरित सोलर प्लॅन्ट नगर परिषदच्या पाणी पुरवठा योजनेवर किंवा इतरत्र लावावा. त्यामुळे नगर परिषदचे करोडो रुपयाचे वाचतील. विद्युत विभागाचे नवीन सोलर धोरणाच्या अध्यादेशासोबत माजी नगराध्यक्ष व प्रदेश काँग्रेसचे माजी सचिव शेखर शेंडे व माजी प्रदेश सचिव प्रवीण हिवरे यांनी निवेदन दिले.