मिरासदारांच्या कथाकथनाचा वारसा पुढे नेण्याची गरज : योगेश सोमण

    दिनांक :06-Jul-2026
Total Views |
पुणे,
dam ma mirasdar द. मा. मिरासदार यांच्या लेखनात दृष्यात्मक आकलनाचे सामर्थ्य आहे. त्यांच्या कथाकथनाचे श्राव्यरूप स्टोरीटेलिंगचा आदर्श ठरेल. स्टँडअप कॉमेडीच विनोद असे आजचे समीकरण असताना, दमांच्या कथाकथनाचा वारसा पुढे नेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी केले.
 

dam ma mirasdar storytelling legacy yogesh soman marathi literature event pune 
ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि दमांचे बंधू ज्येष्ठ लेखक वसंत मिरासदार यांच्या ९५ व्या जन्मदिनाचे औचित्य साधून द. मा. मिरासदार प्रतिष्ठान आणि स्टोरीटेल यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मिरासदार यांच्या मूळ आवाजातील आठ कथा ऑडिओ बुक्स स्वरूपात स्टोरीटेलवर प्रकाशित करण्यात आल्या. यावेळी ते बोलत होते.
शिवाजीचे हस्ताक्षर, फुकट, भुताचा जन्म, ९९ बादची एक सफर, साक्षीदार, नदीकाठचा प्रकार, धडपडणारी मुले आणि व्यंकुची शिकवणी, अशा दमांच्या ८ कथांचे श्राव्यरूप यावेळी स्टोरीटेलच्या वतीने प्रकाशित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य भाजपचे सरचिटणीस आणि पुणे पुस्तक महोत्सवाचे संचालक राजेश पांडे, स्टोरीटेलचे इंडिया हेड योगेश दशरथ आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थी परिषदेसाठी कथाकथनाचे कार्यक्रम विना मोबदला दमा करत असत, समाजातील हीण संपावे आणि राष्ट्रीय विचारांचा पुरस्कार व्हावा, म्हणून ते आग्रही असत आणि प्रसंगी स्पष्ट भूमिका घेत, असे राजेश पांडे यांनी सांगितले.
वसंत मिरासदार म्हणाले, खिरापतीचा आणि कुरापतीचा, असे विनोदाचे दोन प्रकार आहेत. दमांचा विनोद खिरापतीचा होता. उपरोध आणि उपहास, त्यांनी केला नाही. तू परिहास विनोद कर, हा चि. वि. जोशी यांचा सल्ला त्यांनी मानला आणि शुद्ध, निर्भेळ मनोरंजन करणारा विनोद स्वीकारला.
योगेश दशरथ म्हणाले, स्टोरीटेलिंग या माध्यमासाठी दमांच्या कथा आणि त्यांचे कथाकथन गरजेचे आहेत त्यांच्या कथनातील प्रभावीपणा मजा आणतो.
प्रास्ताविक प्रसाद मिरासदार यांनी केले तर हरी मिरासदार यांनी आभार मानले. सुनेत्रा मंकणी यांनी सूत्रसंचालन केले.