म्यानमारमध्ये आठशे भारतीय ओलीस

    दिनांक :06-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
eight hundred indians held hostage बँकॉकमध्ये ७० हजार पगाराच्या ऑनलाइन जाहिरातींच्या आमिषाचे बळी ठरलेले विविध देशांतील ५३०० तरुणांना थायलंड आणि म्यानमार सीमेवरील कुप्रसिद्ध ‘गोल्डन ट्रँगल’ भागात डांबून ठेवले आहे. यात ८०० ते १ हजार भारतीय तरुण असून महाराष्ट्रातील २५ जणांचा समावेश असल्याची माहिती ‘सिव्हिल सोसायटी नेटवर्क फॉर ह्युमन ट्रॅफिकिंग व्हिक्टिम असिस्टन्स’ या संस्थेने दिली आहे.
 
 
eight hundred indians held hostage
 
५३०० ओलिसांमध्ये १,६०० चिनी, २०० म्यानमारचे, २० थायलंडचे तर फिलिपाइन्स, तैवान, मलेशिया, ब्राझील, रशिया, केनिया, युगांडा, रवांडा व झिम्बाब्वेच्या नागरिकांचा समावेश आहे. थायलंड, लाओस व म्यानमार या देशांच्या सीमा जिथे मिळतात, त्या भागाला ‘गोल्डन ट्रँगल’ म्हटले जाते. हा भाग पूर्वी अमली पदार्थांच्या तस्करीसाठी कुप्रसिद्ध होता. उच्च सुरक्षेखाली असलेल्या या परिसरात सायबर गुन्हेगारी, मानवी तस्करीचे अड्डे आहेत. आशियातील तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून येथे आणले जाते. त्यांचे पासपोर्ट जप्त करून जगभरातील लोकांची सायबर फसवणूक करण्यासाठी त्यांना डांबले जाते. कामास नकार दिल्यास बंदुकीचा धाक, विजेचा शॉक देत मारहाणही केली जाते, असे संस्थेने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. ओलीस ठेवलेल्या नाशिकच्या कौस्तुभ शेजवळ या तरुणाने एक व्हिडीओ जारी करत आपल्यावरील अत्याचाराची माहिती दिली. त्याने सुटकेसाठी मदतही मागितली आहे.
 
 
दोन वर्षात २४०० जणांची सुटका
परराष्ट्र मंत्रालय, राष्ट्रीय तपास संस्था आदींच्या प्रयत्नांमुळे गेल्या दोन वर्षांत म्यानमार, कंबोडिया आणि लाओसच्या सायबर स्कॅम केंद्रांमधून २४०० हून अधिक भारतीयांची सुटका करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रांचा अंदाज आहे की, म्यानमारच्या या सेंटर्समध्ये १ लाखाहून अधिक लोकांना इच्छेविरुद्ध तिथे काम करण्यास भाग पाडले आहेत. संयुक्त राष्ट्रे आणि परदेशी दबावानंतर म्यानमार प्रशासनाने या अवैध गुन्हेगारांवर कारवाई केली.