सिडनी,
Ellyse Perry is the first cricketer महिला टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ७ गडी राखून पराभव करत पुन्हा एकदा विश्वविजेतेपदावर नाव कोरले. लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर झालेल्या या विजयानंतर ऑस्ट्रेलियाची अनुभवी अष्टपैलू खेळाडू एलिस पेरीने इतिहास रचला. आयसीसीच्या एकूण ९ स्पर्धा जिंकणारी ती जगातील पहिली क्रिकेटपटू ठरली आहे. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाची कर्णधार सोफी मॉलिन्यूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच इंग्लंडवर दबाव निर्माण केला. लुसी हॅमिल्टनने एमी जोन्सला स्वस्तात बाद केले, तर अॅनाबेल सदरलँडने डॅनियल वायटची विकेट घेत इंग्लंडला आणखी एक धक्का दिला. इंग्लंडची कर्णधार नताली सायव्हरने संयमी फलंदाजी करत ५३ चेंडूंमध्ये ५८ धावांची खेळी साकारली.
अखेरीस फ्रेया केम्पने २८ चेंडूत ४४ धावांची आक्रमक खेळी करत संघाला १५० धावांपर्यंत मजल मारून दिली. ऑस्ट्रेलियाकडून किम गार्थ, लुसी हॅमिल्टन, सोफी मॉलिन्यू आणि अॅनाबेल सदरलँड यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली, तर एलिस पेरीने या सामन्यात गोलंदाजी केली नाही. १५१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच धक्का बसला. लॉरेन बेलने जॉर्जिया वोलला ९ धावांवर बाद केले. मात्र त्यानंतर बेथ मूनी आणि फोबी लिचफिल्ड यांनी शतकी भागीदारी करत इंग्लंडच्या विजयाच्या आशा संपुष्टात आणल्या.
मूनीने ४९ चेंडूंमध्ये १० चौकारांच्या मदतीने ६४ धावा फटकावल्या, तर लिचफिल्डने ३५ चेंडूंमध्ये ४८ धावांची वेगवान खेळी केली. तिच्या डावात सहा चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.एलिस पेरीने अखेरीस १२ चेंडूंमध्ये नाबाद १३ धावांची खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ऑस्ट्रेलियाने १७ चेंडू शिल्लक असताना ७ विकेट्स राखून सामना जिंकला. या विजयासह एलिस पेरीने आयसीसीच्या ९ स्पर्धा जिंकण्याचा अभूतपूर्व विक्रम आपल्या नावावर केला. अंतिम सामन्यातील उत्कृष्ट फलंदाजीसाठी बेथ मूनीला सामनावीर आणि संपूर्ण स्पर्धेतील सातत्यपूर्ण कामगिरीसाठी स्पर्धावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.