अनिल कांबळे
नागपूर,
nagpur rape case फेसबुकवरुन ओळख झाल्यानंतर युवकाने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर नातेवाईक तरुणीशी साक्षगंध उरकुन टाकले. ही बाब प्रेयसीला कळताच तिने पोलिस ठाण्यात बलात्कार केल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला. अमन गणेश धकाते (२८, रा.आदमपडा चौक,लकडगंज) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २५ वर्षीय तरुणी एका खासगी कंपनीत काम करते. शिक्षण घेत असताना २०१९ मध्ये तिची ओळख गेल्या दोन वर्षांपूर्वी अमन धकाते याच्याशी फेसबुकवरुन झाली. दोघांचे काही दिवस चॅटिंग सुरु झाले. त्यानंतर एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेऊन भेटी सुरु झाल्या. त्याने तरुणीच्या घरी गेल्यानंतर थेट शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, तिने नकार देताच काही महिन्यांतच लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्यामुळे तिने संबंधास होकार दिला. त्यानंतर तिने आपल्या आईवडिलांशी अमनची ओळख करुन दिली. त्यानेही लग्नासाठी सर्व बोलणी केली. मात्र, स्वतःच्या आईवडिलांचा प्रेमविवाहस विरोध असल्याचे सांगून काही दिवस वाट बघण्याचे सांगितले. गेल्या २०१९ पासून ते जून २०२६ पर्यंत तो वारंवांर आणि विविध ठिकाणी नेऊन पत्नी असल्याची ओळख देऊन शारीरिक संबंध ठेवत होता. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून तरुणीने लग्नाचा तगादा लावला असता तो टाळाटाळ करायला लागला.
साक्षगंध झाल्याची माहिती
अमनचे ३ जुलैला साक्षगंध झाल्याची माहिती तरुणीला मिळाली. तिने आईसह अमनचे घर गाठले. त्यावेळी अमन आणि त्याच्या नातेवाईकांनी खोटी माहिती देऊन त्यांना शिविगाळ केली. त्यानंतर लग्न करण्यास नकार देऊन घरातून हाकलून दिले. शेजाऱ्यांनी अमनचे साक्षगंध झाल्याची माहिती दिल्यानंतर तरुणीने थेट कळमना पोलिस ठाणे गाठले. बळजबरी शारीरिक संबंध, लग्नाचे खोटे आमिष आणि फसवणूक केल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला.