वाशीम,
food safety अन्न व औषध प्रशासन आयुक्त मुंडे यांच्या आदेशान्वये वाशीम शहरात अन्न सुरक्षा अधिकार्यांनी हॉटेल्सची धडक तपासणी मोहीम राबवली. या धडक कारवाईमुळे विनापरवाना व अस्वच्छतेबाबत निष्काळजीपणा बाळगणार्या हॉटेल चालकांचे धाबे दणाणले आहेत.
या मोहिमेदरम्यान वाशीम येथील ३ प्रमुख हॉटेल्सची कसून तपासणी करण्यात आली. यामध्ये अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ’साई ढाबा’ यांचा परवाना तातडीने निलंबित करण्यात आले आहेत.तसेच, ’हॉटेल गणेश’ आणि अकोला नाका येथील ’हॉटेल चिंतामणी येथे तपासणी दरम्यान काही त्रुटी आढळून आल्याने, त्यांना नियमांचे पालन करण्यासाठी आणि आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी प्रशासनातर्फे ’सुधारणा नोटीस’ बजावण्यात आली आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही. आयुक्तच्या आदेशानुसार ही मोहीम अशीच तीव्रपणे सुरू राहील, अशी माहिती अन्न सुरक्षा अधिकार्यांनी दिली आहे.हॉटेल व्यवसायिकांनी ग्राहकांना दर्जेदार व स्वच्छ अन्नच वाढावे, अन्यथा यापुढील काळातही अशीच कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे