जम्मू,
Hafiz Saeed in NIA's net जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्था (NIA)ने महत्त्वाची कारवाई करत पाकिस्तानस्थित दहशतवादी आणि लष्कर-ए-तोयबाचा (LeT) प्रमुख हाफिज मोहम्मद सईद याला पुरवणी आरोपपत्रात आरोपी म्हणून नमूद केले आहे. जम्मू येथील विशेष एनआयए न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या या आरोपपत्रात सईदवर भारताविरुद्ध दहशतवादी कट रचल्याचे आणि हल्ल्याचे सूत्रधार असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. एनआयएने दाखल केलेले १,५९७ पानी पुरवणी आरोपपत्र हाफिज सईदच्या भूमिकेवर आधारित असून, त्यामध्ये पाकिस्तानमधून रचण्यात आलेल्या कटाचा तसेच तपासादरम्यान गोळा करण्यात आलेल्या पुराव्यांचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे. आरोपपत्रात हाफिज सईदला वैयक्तिक आरोपी म्हणून तसेच बंदी घातलेल्या लष्कर-ए-तोयबा (LeT) आणि त्याची सहयोगी संघटना द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) यांचा प्रमुख म्हणूनही नमूद करण्यात आले आहे.

तपास संस्थेने भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ तसेच बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा, १९६७ (UAPA) अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हे दाखल केले आहेत. भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याचा कट, सीमेपलीकडून दहशतवादी कारवायांचे नियोजन आणि देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याचे गंभीर आरोपही आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आले आहेत.हाफिज मोहम्मद सईद हा लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक असून तो जमात-उद-दावा या संघटनेशीही संबंधित आहे. भारताने त्याला मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट केले असून २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या कटातही त्याची भूमिका असल्याचा आरोप आहे. २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामजवळील बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांची हत्या करण्यात आली होती, तर १७ जण जखमी झाले होते. हल्लेखोरांनी पर्यटकांना धर्म विचारल्यानंतर गोळीबार केल्याचा आरोप तपासात समोर आला होता. या हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' सुरू करत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर लक्ष्यित कारवाई केली होती. आता एनआयएने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रामुळे या प्रकरणाच्या तपासाला आणखी बळ मिळाल्याचे मानले जात आहे.