नवी दिल्ली,
india gets another dravid भारतीय क्रिकेटचे माजी कर्णधार राहुल द्रविड यांचा मुलगा अन्वय द्रविड याने भारत आणि श्रीलंका अंडर-19 संघांमधील सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शतक अवघ्या काही धावांनी हुकले असले, तरी त्याने खेळलेल्या आक्रमक डावाच्या जोरावर भारतीय संघाने मोठी धावसंख्या उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
प्रथम फलंदाजी करताना भारताच्या अंडर-19 संघाची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अन्वय द्रविडने डाव सावरत आक्रमक खेळाचे दर्शन घडवले. त्याने ६७ चेंडूंमध्ये ८७ धावा फटकावत ९ चौकार आणि १ षटकार लगावला. दुसऱ्या बाजूने अर्जुन राजपूत यानेही ८१ चेंडूंमध्ये ७६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या दोघांच्या योगदानामुळे भारतीय संघाने २८५ धावांचा मजबूत टप्पा गाठला.
मालिकेतील पहिल्या सामन्यात अन्वयला केवळ १४ धावा करता आल्या होत्या. मात्र दुसऱ्या सामन्यात त्याने संयमी आणि आत्मविश्वासपूर्ण फलंदाजी करत शानदार पुनरागमन केले. सुमारे १७ वर्षांचा अन्वय उजव्या हाताचा फलंदाज असून सध्या भारताच्या अंडर-19 संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. विविध क्रमांकांवर फलंदाजी करण्याची क्षमता त्याने यापूर्वीही दाखवली असून, या खेळीमुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे.
दरम्यान, राहुल द्रविड यांचा मोठा मुलगा समित द्रविड हाही क्रिकेटमध्ये आपली छाप पाडत आहे. तो नुकताच महाराजा टी-20 स्पर्धेत खेळताना दिसला होता आणि काही डावांमध्ये त्यानेही प्रभावी कामगिरी केली होती. द्रविड बंधू सातत्याने चांगली कामगिरी करत राहिल्यास भविष्यात भारतीय वरिष्ठ संघाचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले होऊ शकतात. मात्र त्यासाठी त्यांना देशांतर्गत आणि वयोगटातील क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण प्रदर्शन कायम ठेवावे लागणार आहे.