बुलढाणा
indrayani river flood आषाढी वारी २०२६ च्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची माहिती समोर आली आहे. इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत आळंदी शहरात येणे अत्यंत असुरक्षित असून, वारकरी आणि भाविकांनी सुरक्षेची काळजी घ्यावी, असे जाहीर आणि नम्र आवाहन महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे अध्यक्ष आणि पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सदस्य प्रकाश महाराज जवंजाळ यांनी केले आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानासाठी राज्यभरातून लाखो वारकरी आणि भाविक आळंदीकडे मार्गस्थ होत असतात. मात्र, सद्यस्थितीत इंद्रायणी नदीने रौद्ररूप धारण केल्याने आळंदीत प्रवेश करण्याचे सर्व मुख्य मार्ग पाण्याखाली गेले आहेत.ज्या वारकरी आणि भाविकांनी आळंदीच्या दिशेने आपला प्रवास सुरू केला आहे, त्यांनी पुढे न येता सध्या ज्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणीच सुरक्षित थांबावे. पूरस्थिती नियंत्रणात येईपर्यंत आळंदीमध्ये प्रवेश करण्याचा कोणताही प्रयत्न करू नये, असे स्पष्ट निर्देश या आवाहनात देण्यात आले आहेत.
नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच नदीपात्र, घाट परिसर आणि प्रशासनाकडून बंद करण्यात आलेल्या पुलांकडे जाणे कटाक्षाने टाळावे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत.
या आपत्कालीन परिस्थितीत सर्वांनी संयम बाळगावा आणि पोलीस यंत्रणा, प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करावे, अशी विनंती प्रकाश महाराज जवंजाळ यांनी केली आहे.