मुंबई
isha malviya मराठमोळा गायक संजू राठोडने आपल्या लोकप्रिय गाण्यांच्या जोरावर बॉलिवूडमध्ये दमदार पाऊल टाकले आहे. त्याच्या आवाजातील ‘गुलाबी साडी’ हे गाणे मराठीत प्रचंड गाजले असून सोशल मीडियावर या गाण्यावर असंख्य रील्स तयार करण्यात आले. सामान्य चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनीही या गाण्यावर ठेका धरला होता. आता या लोकप्रिय गाण्याचे हिंदी व्हर्जन बॉलिवूडमधील ‘धमाल 4’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या नव्या आवृत्तीवर अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री अंजली आनंद यांच्यावर गाणे चित्रित करण्यात आले आहे. दरम्यान, ‘बिग बॉस 17’ फेम अभिनेत्री ईशा मालवीयलाही या गाण्यावर नृत्य करण्याचा मोह आवरला नाही. गुलाबी साडी परिधान करून तिने या गाण्यावर आकर्षक डान्सचा रील व्हिडीओ तयार केला असून त्यावर रितेश देशमुखनेही प्रतिक्रिया दिली आहे.
ईशा मालवीय सोशल मीडियावर विविध गाण्यांवरील तिच्या डान्स व्हिडीओंसाठी विशेष ओळखली जाते. तिचे व्हिडीओ अल्पावधीतच व्हायरल होतात. विशेष म्हणजे, संजू राठोडच्या ‘लाल बांगडी’ या म्युझिक अल्बममध्येही ती झळकली होती. संजूच्या गाण्यांची चाहती असलेल्या ईशाने आता ‘गुलाबी साडी’च्या हिंदी व्हर्जनवर सादर केलेल्या तिच्या डान्स व्हिडीओला नेटकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असून अभिनेता रितेश देशमुखनेही तो व्हिडीओ लाईक केला आहे. अवघ्या २० तासांत या व्हिडीओला साडेपाच लाखांहून अधिक लाइक्स मिळाले असून हजारो नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
‘धमाल 4’ हा लोकप्रिय ‘धमाल’ फ्रँचायझीमधील चौथा isha malviya चित्रपट असून तो येत्या १० जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. इंद्र कुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून अजय देवगण, रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफरी, संजय मिश्रा आणि जॉनी लिव्हर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटातील ‘साडी’ या गाण्याने आधीच सोशल मीडियावर लक्ष वेधले असून हे गाणे मराठी आवृत्तीप्रमाणेच लोकप्रिय ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.दरम्यान, काही दिवसांपूर्वी ईशा मालवीयचा आणखी एक व्हिडीओ चर्चेत आला होता. या व्हिडीओमध्ये ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे हुबेहूब दिसणाऱ्या एका व्यक्तीशी हस्तांदोलन करताना आणि संवाद साधताना दिसली होती. ईशाने त्या व्यक्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदी समजल्याची चर्चा रंगली होती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिची मोठ्या प्रमाणावर खिल्ली उडवली होती.