दीपाली सय्यद यांना २५ कोटींची अब्रूनुकसानीची नोटीस

    दिनांक :06-Jul-2026
Total Views |
पुणे
rupali chakankar नाशिकच्या भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात यांच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ Maharashtra Epstein Files या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या चित्रपटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर आधारित पात्र अभिनेत्री दीपाली सय्यद साकारणार असल्याने वाद अधिकच चिघळला आहे. या पार्श्वभूमीवर, प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना अशा प्रकारे चित्रपटाची निर्मिती करणे योग्य नसल्याची भूमिका यापूर्वीच मांडणाऱ्या रुपाली चाकणकर यांनी आता चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांना २५ कोटी रुपयांच्या अब्रूनुकसानीची कायदेशीर नोटीस बजावली आहे.
 

maharashtra epstein files controversy: rupali chakankar sends rs 25 crore defamation notice 
नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात याच्याविरोधात अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप समोर आल्यानंतर या प्रकरणाने देशभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणात अशोक खरात याचे अनेक राजकीय व्यक्ती तसेच आयएएस अधिकाऱ्यांशी साटेलोटे असल्याचाही दावा समोर आला होता. त्याच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांचे तसेच शिवसेना शिंदे गटातील नेत्यांचे छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. एवढेच नव्हे, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या समोर अशोक खरात बसल्याचे छायाचित्रदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. या संपूर्ण प्रकरणानंतर रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर या rupali chakankar चित्रपटातील रुपाली चाकणकर यांच्यासारख्या पात्राची विशेष चर्चा सुरू झाली आहे. अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी या भूमिकेसाठी केवळ हेअरस्टाईलच नव्हे, तर एकूण व्यक्तिमत्त्वही रुपाली चाकणकर यांच्या धर्तीवर साकारल्याचे चित्रपटाच्या फर्स्ट लूकमधून दिसून आले आहे. याच मुद्द्यावर रुपाली चाकणकर यांनी आक्षेप नोंदवला आहे. अशोक खरात प्रकरणात ईडीची चौकशी सुरू असून हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. एखादा खटला निकाली निघण्यापूर्वी त्यावर अशा स्वरूपाचा चित्रपट तयार करणे योग्य नसल्याचे मत त्यांनी यापूर्वी व्यक्त केले होते.
दरम्यान, आता या वादाने कायदेशीर स्वरूप धारण केले असून रुपाली चाकणकर यांनी ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांना २५ कोटी रुपयांच्या अब्रूनुकसानीची नोटीस पाठविली आहे. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.