माळशेज ओतूर,
malshej ghat महिन्याच्या प्रारंभापासून माळशेज घाट परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने संपूर्ण घाट परिसर हिरवागार झाला असून निसर्गसौंदर्याने बहरलेल्या या पर्यटनस्थळाला नवसंजीवनी मिळाली आहे. मुसळधार पावसामुळे घाटातील लहान-मोठे सर्व धबधबे प्रवाहित झाले आहेत.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेला माळशेज घाट हा राज्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांपैकी एक मानला जातो. यंदाच्या पावसामुळे घाटातील विविध धबधबे पुन्हा जिवंत झाले असून विशेषतः काळू वॉटरफॉल, आडराई ट्रेक, पिंपळगाव जोगा धरण, तसेच खुबी आणि खिरेश्वर परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
पावसाळ्याच्या पृष्ठभूमीवर घाट परिसरातील डोंगररांगा, दऱ्या, ओढे आणि धबधबे अधिकच मनमोहक झाले आहेत. ढगांनी वेढलेले डोंगर, सतत कोसळणारा पाऊस आणि दाट धुक्यामुळे संपूर्ण परिसरात रमणीय वातावरण निर्माण झाले आहे. अनेक पर्यटक छायाचित्रण, व्हिडिओग्राफी तसेच ट्रेकिंगचा आनंद घेताना दिसून येत आहेत.
स्थानिक व्यावसायिकांना रोजगार संधी
पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता स्थानिक व्यावसायिकांनाही दिलासा मिळाला आहे. खाद्यपदार्थांची हॉटेल्स, चहाचे स्टॉल, वाहनतळ, होमस्टे, मार्गदर्शक आणि इतर पर्यटनाशी संबंधित व्यवसायांना चांगली चालना मिळत असून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. ग्रामीण भागातील महिला बचतगटांकडून स्थानिक खाद्यपदार्थांची विक्रीही वाढू लागली आहे.