नवी दिल्ली,
Module busted; 6 suspects arrested दहशतवादविरोधी मोहिमेत दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला मोठे यश मिळाले असून, दिल्ली आणि पंजाबमध्ये कारवाई करत सहा संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात या आरोपींचा संबंध पाकिस्तानस्थित गुंड आणि आयएसआय एजंट शहजाद भट्टी यांच्या नेटवर्कशी असल्याचे समोर आले आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, या कारवाईत सुरक्षा यंत्रणांनी दोन स्वतंत्र मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. यापैकी एक मॉड्यूल दहशतवादी कारवायांचे नियोजन करत होते, तर दुसरे मॉड्यूल अवैध शस्त्रांची तस्करी आणि पुरवठा करण्याचे काम करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून अनेक पिस्तूल आणि पेट्रोल बॉम्ब जप्त केले आहेत. प्राथमिक चौकशीत देशात दहशतवादी आणि गुन्हेगारी कारवाया घडवून आणण्याचा कट रचला जात असल्याचे संकेत मिळाले आहेत.अटक करण्यात आलेल्या संशयितांची सध्या कसून चौकशी सुरू असून, त्यांच्या संपर्कातील व्यक्ती, आर्थिक व्यवहार, शस्त्रांचा पुरवठा, निधीचे स्रोत आणि संभाव्य लक्ष्यांचा तपास केला जात आहे. या नेटवर्कमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचाही शोध तपास यंत्रणा घेत आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तपास अद्याप सुरू असून मिळणाऱ्या पुराव्यांच्या आधारे या प्रकरणात आणखी अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.