मुंबई,
mumbai chawl collapse मुंबईतील मानखुर्दमधील जनता नगर परिसरात रविवारी रात्री तीन मजली कच्च्या चाळीचा भाग कोसळल्याने पाच लहान मुले आणि एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर एक तरुण जखमी झाला. ही चाळ धोकादायक असल्याने रहिवासी घरातील सामान बाहेर काढत असतानाच अचानक संपूर्ण बांधकाम कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.घटनेनंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, मुंबई अग्निशमन दल, पोलिस, महानगरपालिका आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. युद्धपातळीवर बचावकार्य राबवून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आले.
रविवारी रात्री मानखुर्दमधील हनुमान मंदिराजवळील जनता नगर परिसरातील चाळ क्रमांक ५ मध्ये ही घटना घडली. तळमजल्यासह तीन मजली कच्च्या बांधकामातील दोन ते तीन घरे क्षणार्धात कोसळली. ढिगाऱ्याखाली अनेक रहिवासी अडकले. माहिती मिळताच बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. जखमींना तातडीने गोवंडी येथील पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालय आणि घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका महिलेसह तीन लहान मुली आणि एका लहान मुलाला मृत घोषित करण्यात आले. तर राजावाडी रुग्णालयात आणखी एका लहान मुलाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेत एकूण सहा जणांचा मृत्यू झाला असून एका तरुणावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
जखमींवर सर्वोत्तम उपचार करा : उपमुख्यमंत्री
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेबाबत समाज माध्यमगवर शोक व्यक्त करत, एनडीआरएफ, अग्निशमन दल, पोलिस आणि महानगरपालिका प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केल्याची माहिती दिली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घटनेचा आढावा घेतला असून गरज पडल्यास जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करून सर्वोत्तम उपचार देण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला शोक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानखुर्द घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. मृतांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांनी शोकाकुल कुटुंबीयांच्या दुःखात शासन सहभागी असल्याचे म्हटले आहे. मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा त्यांनी केली.