७ धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ

    दिनांक :06-Jul-2026
Total Views |
मुंबई
mumbai dam water मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये मागील सहा दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून या पावसामुळे मुंबईकरांचे पाणीटंचाईचे टेन्शन काही प्रमाणात कमी झाले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने जलाशयातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. मागील २४ तासांत सातही धरणांतील एकूण पाणीसाठा १६.९२ टक्क्यांवर पोहोचला असून केवळ एका दिवसात ३.७३ टक्क्यांची वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
 

mumbai dam water level update heavy rain boosts 7 dams storage bhatsa tansa modak sagar 
मुंबई शहराला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. या सर्व जलाशयांमध्ये एकूण १४,४७,३६३ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा असून काल संध्याकाळी ६ वाजेपर्यंत त्यात २,४४,९०० दशलक्ष लिटर पाण्याची भर पडली आहे. गेल्या सात दिवसांत झालेल्या पावसामुळे धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
धरणनिहाय पाणीसाठ्याचा विचार करता अप्पर वैतरणामध्ये ४.९९ टक्के, तुळशीमध्ये ८२.१४ टक्के, विहारमध्ये ९०.६१ टक्के, भातसामध्ये १४.१२ टक्के, तानसामध्ये १७.३४ टक्के, मोडक सागरमध्ये ३०.९६ टक्के आणि मध्य वैतरणामध्ये १८.३५ टक्के पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे.
मागील २४ तासांतील पावसामुळे अनेक धरणांमध्ये पाणीपातळी वाढली आहे. भातसा धरणाची पातळी २.१० मीटरने, मोडक सागरची ०.९१ मीटरने, तानसाची ०.७५ मीटरने, मध्य वैतरणाची १.९० मीटरने तर तुळशी धरणाची पातळी १.१३ मीटरने वाढली आहे. हवामान विभागाने ८ जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवला असून त्यामुळे पुढील काही दिवसांत धरणसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पुण्यातील खडकवासला धरण परिसरात पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. शहर आणि परिसरातून हजारो नागरिक सहकुटुंब चौपाटीवर दाखल होत असून गर्दी वाढल्याने सिंहगड रस्ता आणि धरण परिसरातील वाहतूक मंदावली आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.दुसरीकडे, पुण्यातही मुसळधार पाऊस सुरू असून आळंदी परिसरातील इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याची माहिती समोर आली आहे.