मुंबई
mumbai local train मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आधीच प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली असताना सोमवारी मध्य रेल्वेच्या तांत्रिक बिघाडामुळे त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली. भांडूप आणि कांजूरमार्ग स्थानकांदरम्यान विक्रोळी परिसरात ओव्हरहेड वायर (Overhead Equipment – OHE) वर प्लास्टिक अडकल्याने काही काळ लोकल वाहतूक विस्कळीत झाली.
या तांत्रिक अडथळ्यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकल गाड्या काही काळासाठी थांबवण्यात आल्या. परिणामी अनेक गाड्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावू लागल्या आणि सकाळच्या गर्दीच्या वेळी प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेच्या mumbai local train तांत्रिक पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि ओव्हरहेड वायरवर अडकलेले प्लास्टिक काढण्याचे काम सुरू केले. सुरक्षिततेच्या कारणास्तव काही काळ वाहतूक नियंत्रित करण्यात आली होती. अडथळा दूर झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने लोकल सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू झाले.दरम्यान, मुंबईकडे येणारी वाहतूक प्रभावित झाली असली तरी ठाणे-कल्याण दिशेने जाणाऱ्या लोकल सेवा सुरळीत सुरू असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मुसळधार पावसामुळे उपनगरांतील रेल्वे मार्गांवर सतत तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनली आहे.याआधी कर्जत-खोपोली मार्गावर रुळांखालची खडी वाहून गेल्यामुळे सेवा काही काळ बंद ठेवण्यात आली होती. त्यातच विक्रोळीतील या घटनेमुळे मध्य रेल्वे प्रवाशांना सलग दुसऱ्या दिवशी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना घराबाहेर पडण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल अॅप किंवा सोशल मीडिया हँडलवरून लोकल सेवेची अद्ययावत माहिती तपासूनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.