अनिल कांबळे
नागपूर,
illegal money lending case शहरातील सक्करदरा परिसरात खासगी सावकारी आणि मालमत्ता व्यवहाराच्या आडून आर्थिक शोषणाचा गंभीर प्रकार उघडकीस आला. गरजेपोटी घेतलेल्या तीन लाख रुपयांच्या कर्जाच्या बदल्यात दोन अवैध सावकारांनी कर्जदाराकडून तब्बल १५ लाख रुपये वसूल केले. या प्रकरणी सक्करदरा पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याची महिला साथीदार अद्याप फरार आहे. कमलेश गणपतराव हनोते (४२) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याची फरार साथीदार अनिता पूरनलाल भारद्वाज हिचा पोलिस कसून शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोहित मिलिंद पारधी (वय २४) यांनी मार्च २०२५ मध्ये आरोपी कमलेश हनोते याच्यासोबत ४८ लाख रुपयांत भूखंड खरेदीचा व्यवहार केला होता. या व्यवहारासाठी पारधी यांनी वेळोवेळी सुमारे ३० लाख रुपये दिले. मात्र, दस्त नोंदणी न करता कमलेशने ही रक्कम स्वतःकडेच ठेवली. काही महिन्यांनी पारधी यांना व्यवसायासाठी रोख रकमेची गरज भासल्याने त्यांनी दिलेली रक्कम परत मागितली असता वादाला सुरुवात झाली. रक्कम परत देण्याऐवजी कमलेश हनोते याने पारधी यांची ओळख अनिता भारद्वाज या महिलेबरोबर करून दिली. ती १० टक्के मासिक व्याजाने कर्ज देत असल्याचे सांगितले. पारधी यांनी सुरुवातीला १ लाख रुपये कर्ज घेतले व ते व्याजासह परत केले. त्यानंतर जुलै २०२५ मध्ये त्यांनी पुन्हा ३ लाख रुपये कर्ज घेतले. मात्र, परतफेडीत विलंब झाल्यानंतर अवैध सावकारांचा खरा चेहरा समोर आला.
दमदाटी करुन वसुली
कर्जाची वसुली करण्यासाठी संबंधित दोघांनी पारधी यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ, धमक्या आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप आहे. तसेच घरावर गुंड पाठवून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. या दबावामुळे घाबरलेल्या पारधी यांनी अखेरीस ३ लाखांच्या बदल्यात तब्बल १५ लाख रुपये दिले. तरीही संबंधितांकडून आणखी पैशांची मागणी सुरूच होती. शेवटी त्रस्त झालेल्या पारधी यांनी सक्करदरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कमलेश हनोते याला अटक केली असून त्याची साथीदार अनिता भारद्वाज फरार आहे. या प्रकरणात अवैध सावकारी आणि धमक्यांच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक करणारी टोळी कार्यरत आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. आणखी काही व्यक्तींचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे