वैदिक विधींनी जुळले सातासमुद्रापारचे नाते

नागपूरच्या सुमित पन्नासेचा पोलंडच्या मार्टासोबत शास्त्रोक्त विवाह

    दिनांक :06-Jul-2026
Total Views |
नागपूर,
nagpur news प्रेम, विश्वास आणि संस्कृतींचा सुंदर मिलाफ साधणारा एक आगळावेगळा विवाह सोहळा नुकताच नागपुरात संपन्न झाला. नागपूरच्या युवकाने पोलंडमधील युवतीशी संपूर्ण वैदिक पद्धतीने विवाह करत भारतीय संस्कृतीचे जागतिक आकर्षण आणि परंपरांबद्दलचा आदर अधोरेखित केला.
 
nagpur news
 
दिवंगत सुनंदा व अरुण पन्नासे यांचे कनिष्ठ चिरंजीव सुमित पन्नासे आणि पोलंडमधील डोरोटा व पायोत्र स्टेझली यांची कन्या मार्टा हे विवाहबद्ध झाले. लंडनमधील एका आयटी कंपनीत काम करत असताना सुमित आणि मार्टा यांची ओळख झाली. मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाल्यानंतर दोघांनीही आपल्या कुटुंबीयांची संमती घेत वैवाहिक आयुष्याची नवी सुरुवात करण्याचा निर्णय घेतला.
 
 
या विवाह सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे मार्टाने भारतीय संस्कृतीचा मनापासून स्वीकार करत पारंपरिक भारतीय वेशभूषा परिधान केली आणि प्रत्येक वैदिक विधीत उत्साहाने सहभाग घेतला. गणेशपूजन, मंगलाष्टके, होमहवन, सप्तपदीसह सर्व धार्मिक विधी शास्त्रोक्त पद्धतीने पार पडले. विवाहाचे पौरोहित्य करणारे महेश पाठक गुरुजी यांनी प्रत्येक विधीचे महत्त्व इंग्रजी भाषेत समजावून सांगितले. प्रत्येक विधीमागील तत्त्वज्ञान समजून घेत मार्टाने श्रद्धापूर्वक सर्व संस्कार पूर्ण केल्याने उपस्थितांमध्ये विशेष कौतुकाचा विषय ठरला. विवाहातील सर्वांत महत्त्वाचा मानला जाणारा कन्यादानाचा विधीही वधूचे आई-वडील डोरोटा व पायोत्र यांनी भारतीय परंपरेनुसार समजून घेत भावनिक वातावरणात पूर्ण केला.
दोन देशातील सांस्कृतिक बंध दृढ करणारा विवाह
जागतिकीकरणामुळे जग जवळ आले असले तरी विविध संस्कृतींच्या पृष्ठभूमीवर परंपरांचा सन्मान राखत होणारे विवाह क्वचितच पाहायला मिळतात. सुमित आणि मार्टा यांच्या विवाहाने भारतीय संस्कृतीची समृद्ध परंपरा, तिचे सार्वत्रिक मूल्य आणि जगभरातील आकर्षण पुन्हा एकदा अधोरेखित केले. भारत आणि पोलंड या दोन देशांतील सांस्कृतिक बंध अधिक दृढ करणारा हा विवाह सोहळा उपस्थितांसाठी संस्मरणीय ठरला.