अनिल कांबळे
नागपूर,
nagpur temple donation जामसावळी येथील मंदिराचे अधिकृत प्रतिनिधी असल्याचे भासवून देणगी व वर्गणी गोळा करणाऱ्या तिघांना बेलतरोडी पोलिसांनी अटक केली. मंदिर ट्रस्टच्या नावाचा गैरवापर करून नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ते सध्या पोलिस कोठडीत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कृष्णा सेनाजी वाळके (३५, रा. मोहपा, ता. कळमेश्वर), राजा गंगाधर काळे (२२, सध्या रा. बाबुळखेडा, नागपूर) आणि विशाल केशव वाळके (१९, रा. ताराबोरी, काटोल रोड, ता. काटोल) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सुमारे ९ वाजताच्या सुमारास आरोपी बेलतरोडी येथील साफल्य अपार्टमेंटमध्ये राहणारे सिव्हिल कंत्राटदार राजेंद्र किसनराव संगम (५०) यांच्या घरी गेले. त्यांनी स्वतःला जामसावली येथील एका मंदिराचे अधिकृत प्रतिनिधी असल्याचे सांगत मंदिरातील महाप्रसाद व धार्मिक कार्यासाठी देणगी व वर्गणीची मागणी केली. मात्र, आरोपींच्या बोलण्यावर संशय आल्याने संगम यांनी त्यांची अधिक चौकशी केली आणि तत्काळ बेलतरोडीचे ठाणेदार रितेश अहेर यांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातील पावती पुस्तके जप्त करून त्यांची पडताळणी करण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांनी जामसावळी मंदिर ट्रस्टच्या सचिवांशी संपर्क साधला असता, संबंधित तिघांना ट्रस्टच्या वतीने देणगी किंवा वर्गणी गोळा करण्यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी अथवा नियुक्ती देण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच प्राथमिक चौकशीत आरोपींनी मंदिराचे नाव वापरून नागरिकांची दिशाभूल केल्याचे समोर आले. त्यांनी एका नागरिकांकडून आतापर्यंत लाखो रुपये उकळल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१९(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून आणखी कुठे अशाच प्रकारे फसवणूक करण्यात आली आहे का, याचा तपास पोलिस करीत आहे