जेरुसलेम,
Netanyahu's response to J.D. Vance अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी इस्रायलने आपल्या "एकमेव शक्तिशाली मित्रदेशा"शी मतभेद टाळावेत, असे वक्तव्य केल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेचे महत्त्व मान्य करतानाच इस्रायलला भारतासह इतर अनेक देशांचाही ठाम पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत नेतान्याहू म्हणाले की, भारतासारख्या १.४ अब्ज लोकसंख्या असलेल्या देशातून इस्रायलला मोठा पाठिंबा मिळत आहे. इस्रायलचे अनेक मित्रदेश आहेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना व्यापक सहकार्य मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. गाझा, इराण आणि लेबनॉनमधील संघर्षांमुळे इस्रायलवर जगभरातून टीका होत असली, तरी अनेक देशांशी संबंध मजबूत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

नेतान्याहू यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष कौतुक करत त्यांना व्हाईट हाऊसमधील इस्रायलचे सर्वात मोठे समर्थक म्हटले. तसेच, उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांच्याबद्दल आदर व्यक्त करताना, त्यांच्या प्रत्येक विधानाशी आपण सहमत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी त्यांनी सोशल मीडियाचाही उल्लेख केला. फेसबुकसारख्या माध्यमांवर भारतातून इस्रायलला मोठा पाठिंबा मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. काही देशांमध्ये इस्रायलविरोधी आणि ज्यूविरोधी मजकूर प्रसारित करणे ही फॅशन झाली असली, तरी त्याच देशांचे नेते प्रत्यक्षात इस्रायलशी करार करण्यासाठी किंवा लष्करी सहकार्याबाबत चर्चा करण्यासाठी संपर्क साधतात, असेही नेतान्याहू यांनी सांगितले. दरम्यान, जेडी व्हान्स यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलताना, "जर मी इस्रायलच्या मंत्रिमंडळात असतो, तर जगातील आमच्या एकमेव शक्तिशाली मित्रदेशाविरुद्ध पाऊल उचलले नसते," असे वक्तव्य केले होते. या विधानानंतर दोन्ही देशांतील संबंधांबाबत चर्चा सुरू झाली असून, त्यावर नेतान्याहू यांनी भारताचा उल्लेख करत इस्रायलला अमेरिकेव्यतिरिक्तही अनेक विश्वासू मित्रदेश असल्याचा संदेश दिला.