वॉशिंग्टन,
Neymar's sudden retirement फिफा विश्वचषक २०२६ मधील ब्राझीलचा प्रवास संपल्यानंतर स्टार फुटबॉलपटू नेमारने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली. १६ संघांच्या फेरीत नॉर्वेकडून ब्राझीलला २-१ असा पराभव स्वीकारावा लागला आणि त्यानंतर नेमारने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम देण्याचा निर्णय जाहीर केला. या घोषणेमुळे जगभरातील लाखो फुटबॉल चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.न्यू जर्सीतील मेटलाइफ स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात नेमारने ब्राझीलसाठी एकमेव गोल नोंदवला. मात्र त्यापूर्वीच नॉर्वेने दोन गोल करत आघाडी घेतली होती. अखेर ब्राझीलचा पराभव निश्चित झाल्यानंतर अंतिम शिट्टी वाजताच नेमारने निवृत्ती जाहीर केली.

भावनिक शब्दांत आपल्या निर्णयामागील कारण सांगताना नेमार म्हणाला, "मी संघासाठी सर्वस्व पणाला लावले, मात्र आता मी थकलो आहे. माझ्या आंतरराष्ट्रीय प्रवासाची सुरुवात ज्या मेटलाइफ स्टेडियमवर झाली, त्याच मैदानावर मी माझी कारकीर्द संपवत आहे."२०१० मध्ये ब्राझीलच्या वरिष्ठ संघातून पदार्पण करणाऱ्या नेमारने देशासाठी १२९ आंतरराष्ट्रीय सामने खेळले. या काळात त्याने ८० गोल करत ब्राझीलच्या पुरुष फुटबॉल इतिहासातील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू म्हणून विक्रम प्रस्थापित केला. त्याच्या नेतृत्वाखाली ब्राझीलने रिओ २०१६ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले, तर लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकाची कमाई केली. याशिवाय २०१३ मध्ये ब्राझीलला फिफा कॉन्फेडरेशन्स कप जिंकून देण्यातही त्याचा मोलाचा वाटा होता. विश्वचषकातील पराभवानंतर नेमारच्या निवृत्तीच्या घोषणेने ब्राझीलच्या फुटबॉलमधील एका सुवर्ण पर्वाचा शेवट झाला असून, त्याच्या योगदानाची नोंद देशाच्या क्रीडा इतिहासात कायम स्मरणात राहणार आहे.