अग्निवीरांना 'पर्मनंट' करण्याचा फॉर्म्युला बदलणार?

    दिनांक :06-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Permanent formula for Agniveers अग्निपथ योजनेअंतर्गत भरती झालेल्या अग्निवीरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर कायम सेवेत घेण्यात येणाऱ्या अग्निवीरांचे प्रमाण वाढवण्याचा प्रस्ताव तिन्ही सशस्त्र दलांनी केंद्र सरकारकडे पाठवला आहे. सध्या केवळ २५ टक्के अग्निवीरांना गुणवत्तेच्या आधारे कायम सेवेत घेण्याची तरतूद असताना, हे प्रमाण वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.अग्निपथ योजना २०२२ मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेनुसार तरुणांना अग्निवीर म्हणून चार वर्षांसाठी लष्कर, नौदल आणि हवाई दलात संधी दिली जाते. सेवाकाल पूर्ण झाल्यानंतर गुणवत्तेच्या आधारे निवडक जवानांना कायम सेवेत सामावून घेण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सुरुवातीपासूनच या कायम भरतीची मर्यादा २५ टक्के निश्चित करण्यात आली होती.
 
 

Agniveers 
 
मात्र, सध्याच्या परिस्थितीत तिन्ही दलांनी ही मर्यादा वाढवण्याची शिफारस केली आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, भारतीय नौदलाने सर्वाधिक ७५ टक्के अग्निवीरांना कायम सेवेत घेण्याचा प्रस्ताव दिला आहे. तर भारतीय लष्कर आणि हवाई दलाने हे प्रमाण २५ टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. या प्रस्तावांवर अद्याप केंद्र सरकारने अंतिम निर्णय घेतलेला नसला, तरी त्यावर विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, कायम भरतीचे प्रमाण वाढवले गेले नाही तरी काही विशिष्ट युनिट्समध्ये अतिरिक्त अग्निवीरांचा समावेश करण्याचा पर्याय विचाराधीन आहे. मात्र, अशा परिस्थितीतही एकूण कायम भरतीची मर्यादा २५ टक्क्यांपर्यंतच राहू शकते.
 
 
गेल्या वर्षी सुमारे ७० हजार अग्निवीर प्रशिक्षणासाठी सैन्यात दाखल झाले होते. पुढील वर्षी ही संख्या वाढवण्यासाठी भरतीच्या जागा ९० हजारांपर्यंत नेण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या सुमारे १.८ लाख सैनिकांची कमतरता भरून काढण्यासाठी सशस्त्र दलांकडून नियोजन केले जात असल्याचेही वृत्त आहे. अग्निपथ योजनेचा उद्देश देशातील तरुणांना अल्पकालीन सैन्यसेवेची संधी उपलब्ध करून देणे आणि त्यातून गुणवत्तेच्या आधारे निवडक जवानांना कायम सेवेत स्थान देणे हा आहे. आता कायम सेवेत घेतल्या जाणाऱ्या अग्निवीरांचे प्रमाण वाढवले जाते का, याकडे हजारो तरुणांचे लक्ष लागले आहे.