मुंबई-पुणे संपर्कावर पावसाचा घाला!

दरडी कोसळल्या, वाहतूक विस्कळीत

    दिनांक :06-Jul-2026
Total Views |
मुंबई,
Rain disrupts Mumbai-Pune connectivity महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली असून कोकण, मुंबई महानगर प्रदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्यानंतर भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीसह पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्यांतील घाटमाथ्यासाठी पुढील ४८ तासांचा रेड अलर्ट जारी केला आहे. अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देत नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, घाटमाथा परिसरात अतिवृष्टीमुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून भूस्खलनाचा धोकाही वाढला आहे. याशिवाय कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतही पुढील काही दिवस जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शहरांमध्ये यलो अलर्ट असला तरी घाट परिसरात परिस्थिती अधिक गंभीर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
 

Mumbai-Pune connectivity 
 
मुसळधार पावसाचा फटका वाहतुकीलाही बसला आहे. पुणे आणि रायगड जिल्ह्यात मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील 'मिसिंग लिंक' परिसरात दरड कोसळल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरही दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. दरड हटविण्याचे काम प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.रेल्वे वाहतुकीवरही या पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर दरड कोसळल्याने १६ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
 
 
दरम्यान, मुसळधार पावसाचा धोका लक्षात घेऊन पुणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नद्या, ओढे आणि धोकादायक भागांपासून दूर राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबई महानगर प्रदेश तसेच पुणे-नाशिक पट्ट्यातील नागरिकांना हवामान विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने सतर्कता वाढवली आहे.